गुरुपेक्षा 13 पट मोठ्या ग्रहाचा लावला शोध
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेतील (पीआरएल) प्राध्यापक अभिजीत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. या ग्रहाचा आकार गुरु ग्रहापेक्षा 13 पट मोठा आहे.
भारत, जर्मनी, स्वीत्झर्लंड आणि अमेरिकेचे संशोधक असलेल्या या पथकाने ग्रहाचे वस्तूमान अचूकपणे मोजण्यासाठी माउंट अबू येथील गुरुशिखर वेधशाळेत स्वदेशी पीआरएल अॅडव्हान्स्ड रेडियल वेलोसिटी अबू-स्काय सर्च स्पेक्ट्रोग्राफचा (पीएआरएएस) वापर केला. या ग्रहाचे वस्तुमान 14 ग्रॅम/सेमी 3 असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतातील पीआरएल वैज्ञानिकांकडून शोधण्यात आलेला हा तिसरा एक्सोप्लॅनेट आहे. याचा विस्तृत तपशील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. नवीन शोधलेला ग्रह टीओआय 4603 किंवा एचडी 245134 नावाऱ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. नासाने यापूर्वी या ताऱ्याला अज्ञात असल्याचे घोषित केले होते. परंतु आता तो ग्रह असल्याची पुष्टी झाली असून त्याला टीओआय 4603बी किंवा एचडी 24513बी नाव देण्यात आले आहे.
हा ग्रह पृथ्वीपासून 731 प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे आणि दर 7.24 दिवसांमध्ये तो स्वत:च्या ताऱ्याभोवती फिरतो. हा ग्रह 1396 अंश तापमानासह अत्यंत तप्त आहे.हा ग्रह मोठे विशाल ग्रह आणि कमी वस्तुमान असलेल्या श्रेणीत येतो यामुळे हा शोध वेगळा ठरतो असे इस्रोने एका पत्रकात नमूद केले आहे. या ग्रहाचे वस्तुमान गुरु ग्रहापेक्षा 11 पट अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर जीवसृष्टीच्या शोधात आतापर्यंत 5 हजारांहून अधिक एक्सोप्लॅनेटचा शोध लागला आहे. या एक्सोप्लॅनेटचे स्वरुप, वैशिष्ट्यो अन् वातावरण परस्परांना भिन्न आहे. परंतु टीओआय 4603बी च्या वस्तुमान श्रेणीत केवळ 5 च ज्ञात एक्सोप्लॅनेट आहेत.