प्रतिनिधी /पणजी
भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करू, असा इशारा हरियाणातील हिस्सार येथील खाप महापंचायतीने दिला आहे. याबाबत काल रविवारी महापंचायतीची खास सभा होऊन गोवा सरकारला येत्या शुक्रवारपर्यंतची मुदत दिली आहे.
सोनाली फोगट खून प्रकरणाचा गोवा पोलीस तपास करीत असून या प्रकरणात सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक केली आहे. तपासकाम जवजवळ पूर्ण झाले असून लवकरच आरोपपत्र दाखल करणार असे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी सांगितले आहे.
सोनाली फोगट खून प्रकरणाला 15 दिवस उलटले असून गोवा पोलिसांच्या तपासकामावर नाखूश असलेल्या फोगट यांच्या कुटुंबियांनी हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी यापुर्वीच केली होती. त्यांनी हरियाणातील मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. सरन्यायाधिशांनाही त्यासाठी साकडे घातले होते. मात्र सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. आता सोनाली फोगट खून प्रकरणाचे तपासकाम सीबीआयकडे सोपवावे असा ठराव खाप महा पंचायतीने घेतला आहे.
सोनाली फोगट यांची मुलगी यशोधारा यांनीही गोवा पोलिसांच्या तपासकामावर अविश्वास व्यक्त केला असला तरी त्यांनीही प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.