मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : खाजगी-सार्वजनिक भागिदारीला प्राधान्य,पहिल्या हेज्ल-पर्यटन सेवेचा जुने गोवेत शुभारंभ
प्रतिनिधी /पणजी
राज्यात उत्तम दर्जाचे आणि उच्च श्रेणीतील पर्यटक यावेत या दृष्टीने त्यांना आकर्षित करण्यासाठी सरकार सर्व पावले उचलत आहे. त्याचबरोबर गोव्याच्या विकासासाठी यापुढे खाजगी-सार्वजनिक भागिदारी प्रकल्प स्थापन करण्यावर अधिक भर असेल आणि त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत. हेली-पर्यटन सेवा हा त्याचाच भाग आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
जुने गोवे धावजी येथे शुक्रवारी आयोजित हेलिकॉप्टर सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पर्यटन खात्याने पीपीपी मॉडेलवर ही हेली सेवा सुरू केली आहे. कार्यक्रमास व्यासपीठावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, स्थानिक आमदार राजेश फळदेसाई, सरपंच सेंड्रा गोन्साल्वीस, पर्यटन सचिव संजिव आहुजा, पर्यटन संचालक निखिल देसाई, ब्रिजेश मणेरकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, आदींची उपस्थिती होती. अन्य मान्यवरांमध्ये विन्सन वर्ल्डचे संजय शेट्यो, श्रीपाद शेट्यो, तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित हॉटेल, टूर्स-ट्रॅव्हल्स एजन्सींचे मालक आदींचीही उपस्थिती होती.
दर्जेदार पर्यटकांकडे लक्ष केंद्रीत
गोव्यात आता देशी पर्यटकांची संख्या वाढत असली तरी त्यातील अनेकजण अगदीच निम्म दर्जाचे असतात. असे पर्यटक कुठेही उघड्यावरच नैसर्गिक विधी करतात, उघड्यारच अन्न शिजवून खातात आणि कचरा तेथेच टाकून जातात. अशा गोष्टी पुन्हा होऊ नये यासाठी सुव्यवस्थित आणि दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील 25 वर्षांसाठी साधनसुविधा
आम्ही पुढील 25 वर्षांसाठी सुविधा निर्माण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी असंख्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असून मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन पुलांद्वारे उत्तर ते दक्षिण कनेक्टिव्हिटी यासारख्या सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले आहे. उर्वरित सुविधा पूर्णतेच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे ते म्हणाले.
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत काल’साठी मांडलेल्या संकल्पनेनुसार राज्य सरकार आरोग्य आणि निरोगी पर्यटनावरही भर देत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यटनातील गुंतवणुकीचे स्वागत
आम्ही पायाभूत सुविधांचा दुसरा टप्पा आणि मानवी संसाधने उपलब्ध करून देण्यास सुऊवात केली आहे. उच्च श्रेणीतील पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारी आवश्यक आहे, सरकार एकटे हे करू शकत नाही. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांचे आम्ही स्वागत करू, असे ते म्हणाले.
पर्यटन क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या असून लवकरच कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही ’रात्री 10 नंतर लाऊड म्युझिक’ वरही उपाय काढू असेही सावंत म्हणाले.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तमाम सुविधा : खंवटे
त्यावेळी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी, दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार लवकरच सी प्लेन, स्काय डायव्हिंग, एम्फिबियन व्हेईकल्स, हॉप-ऑन-हॉप-ऑफ बसेस् यासारख्या तमाम सुविधा सुरू करण्यात येणार आहेत, असे सांगितले.
सरकारने मे. हॉक सोअरिंग अॅरोस्पेस कंपनीच्या सहयोगाने हेलिकॉप्टरद्वारे गोवा पर्यटन सेवा सुरू केली आहे. त्यामुळे दर्जेदार पर्यटकांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, असे ते म्हणाले. पर्यटकांना गोव्यात अपेक्षित असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पर्यटकही आता सन, सँड, सी च्या पलिकडे नवीन पर्याय शोधत असून त्यांना विविध पर्यटन सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येक महिन्याला आम्ही पर्यटन क्षेत्रासाठी नवीन सेवा जाहीर करणार आहोत, असे खंवटे यांनी पुढे सांगितले.
ध्रुव शर्मा यांनी स्वागत केले. पर्यटन संचालक निखिल देसाई यांनी प्रास्ताविकपर भाषणात हेली-पर्यटन सेवा आणि एकुणच पर्यटन खात्याच्या योजनांचा आढावा घेतला. धावजी येथील हॅलिपॅड पर्यटन खात्याच्या मालकीचे असून आता ते हेली सेवेसाठी देण्यात आल्याने खात्याला वार्षिक 60 लाख ऊपये उत्पन्न प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार राजेश फळदेसाई यांनीही विचार मांडले. ममता शर्मा यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. हेलीकॉप्टर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुभव शर्मा यांनी आभार व्यक्त केले.
पर्यटन खात्याच्या ’कॉल सेंटर’ सुविधेचा शुभारंभ
गोवा पर्यटन खात्यातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ’कॉल सेंटर’ सुविधेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 1364 या क्रमांकावरून कॉल करून देशभरातील कोणताही नागरिक या सेवेद्वारे गोव्यातील कोणतीही माहिती प्राप्त करू शकणार आहे, ही सेवा अखंड 24 तास सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.