पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सुरक्षा सज्जता , कुपवाडासह अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार
वृत्तसंस्था /श्रीनगर
गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर सीमेवर पाकिस्तानी हद्दीतून कुरापती वाढल्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमधील सर्व सहा सीमा चौक्मयांवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे. दहशतवादी घुसखोरीच्या भीतीमुळे सीमा सुरक्षा दल पाकिस्तानी रेंजर्सना चोख प्रत्युत्तर देत आहे. संपूर्ण सीमेवर हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. विक्रम पोस्टवर झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. या जवानाच्या पायाला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाने निवासी भागातील वीज बंद करण्याचे आदेश दिले असून लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. सीमेवरील गावांमध्ये गोळ्यांचा मारा सुरू झाला असून सीमा चौकीवर मोठ्या प्रमाणात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सीमा सुरक्षा दलाकडून हायमास्ट लाईट लावण्यात येत आहे. अरनिया सेक्टरबरोबरच कुपवाडा येथेही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू असून त्यांना भारतीय सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
लष्करी अधिकाऱ्यांची बैठक
काश्मीर सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुऊवारी डीजीपींनी उत्तर काश्मीरमधील सीमावर्ती जिल्हा कुपवाडा येथे लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील काही भागांना भेट दिली. या काळात काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार, एसएसपी युगल मनहास आणि पोलीस आणि लष्कराचे अधिकारी त्यांच्यासोबत होते.