कित्तूर चन्नम्मा चौकात निदर्शने : हत्या करणाऱयांना फाशीची शिक्षा द्या
प्रतिनिधी / बेळगाव
राजस्थानमधील उदयपूर येथील हिंदू टेलरची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बेळगावमधीलही हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. अशा हत्या करणाऱयांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही करण्यात आली.
कित्तूर राणी चन्नम्मा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या समर्थनात कन्हैयालाल या टेलरने पोस्ट अपलोड केली म्हणून त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेनंतर हिंदूंकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू हत्येच्या घटना वाढल्या आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच जिहादी मुस्लीम हे कृत्य करत आहेत, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषदचे नेते कृष्णा भट्ट यांनी अशा प्रकारच्या हत्या यापुढे हिंदू सहन करणार नाहीत. जशास तसे उत्तर देण्यास हिंदूही सज्ज आहेत, असा इशारा दिला. मुस्लीम धर्माविरोधात बोलणाऱयांचे मुडदे पाडू, अशी धमकी दिली जात आहे. मात्र आता हिंदूंच्या विरोधात बोलणाऱयांना दणका देऊ, अशी समजदेखील त्यांनी दिली.
यावेळी भाजपच्या खासदार मंगला अंगडी, भाजपचे नेते किरण जाधव, माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण भाजपचे मंडल अध्यक्ष धनंजय जाधव, सोनाली सरनोबत, श्रीराम सेनेचे रवी कोकितकर यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.