ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल (POOJA SINGHAL)आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या एकूण 24 ठिकाणांवर ईडीने छापे (ED RAID) टाकले. सिंघल यांच्या सीएकडून ईडीने तब्बल 19.31 कोटींची रक्कम (19.31 crore cash recovered )आणि 150 कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केली आहेत.
बेहिशोबी मालमत्ता, अवैध खाणकाम, आणि मनरेगा घोटाळाप्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी सहा वाजता पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. रांची, मुंबई, दिल्ली आणि जयपूर येथे हे छापे टाकण्यात आले. ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली हे छापे टाकण्यात आले. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांच्या बुटी हनुमाननगर येथील सोनाली अपार्टमेंटमधून 19.31 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर यांचे निवासस्थान, झा यांचे मुझफ्फरपूर, मिठनपुरा येथील निवासस्थान, पूजा सिंघल यांचा भाऊ आणि आई-वडिलांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांच्या कोलकात्यात, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांच्या जयपूर येथील निवासस्थानासह एकूण 24 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.