पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा इशारा, पर्यटन आस्थापनांना ’ना हरकत’ दाखला अनिवार्य
प्रतिनिधी/ पणजी
पर्यटनाशी संबंधित सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब यांना यापुढे पर्यटन खात्याकडून ना हरकत दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
पर्यटन खात्याने यापूर्वी बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱया 1400 पेक्षा जास्त व्यापाऱयांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सर्वांना 30 दिवसांच्या आत खात्याकडे नोंदणी करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्याकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.
पर्यटन क्षेत्रातील विविध प्रकारच्या बेकायदेशीरपणामुळे गत काही वर्षांपासून देश-विदेशात गोव्याची बदनामी झालेली आहे. त्यामुळे या क्षेत्राला सुस्थितीत आणण्याची गरज असून त्यासाठी सरकारी पातळीवर गंभीरतेने प्रयत्न सुरू आहेत, असे खंवटे यांनी सांगितले.
स्टँडअलोन रेस्टॉरंट्स, कॅफे, वेलनेस सेंटर्स आदींना आता कायदेशीर म्हणून संबोधले जाण्यासाठी पर्यटन खात्याकडून ना हरकत दाखला घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, हणजूण येथील वादग्रस्त कर्लिज बीच नाईट क्लबवर करण्यात आलेल्या कारवाईसंबंधी प्रतिक्रिया देताना खंवटे यांनी, अशा गैरकृत्यांबद्दल सरकार तडजोड करणार नाही. किनारी भागात चालणाऱया बेकायदेशीर गोष्टींना थारा देणार नाही, असा इशारा दिला. बेकायदेशीर गोष्टी थांबल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.