वृत्तसंस्था/ रॉटरडॅम
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या शनिवारी येथे झालेल्या पुरूषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात नेदरलँडस्ने (हॉलंड) भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 अशा गोलफरकाने पराभव केल्याने भारताचे या स्पर्धेतील जेतेपदासाठीचे आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 2-2 असे गोलबरोबरीत होते.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत 15 सामन्यांतून 30 गुणांसह तिसऱया स्थानावर असून त्यांचा एक सामना बाकी आहे. नेदरलँडस्ने 13 सामन्यांतून 33 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांचे तीन सामने बाकी आहेत. ऑलिंपिक चॅम्पियन्स बेल्जियमने 14 सामन्यांतून 31 गुण घेत दुसरे स्थान मिळविले असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. गुणतक्त्यातील या स्थितीमुळे भारतीय पुरूष हॉकी संघाचे अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
शनिवारच्या सामन्यात 10 व्या मिनिटाला हॉलंडचे खाते डेरेक डी विल्डेरने मैदानी गोलवर उघडले. त्याने आपल्या शानदार स्टिकवर्कच्या जोरावर भारताच्या दोन बचावफळीतील खेळाडूंना हुलकावणी देत गोल केला. यानंतर भारताला पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते वाया गेले. 22 व्या मिनिटाला भारताच्या दिलप्रित सिंगने वरूण कुमारच्या पासवर हॉलंडच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत शानदार मैदानी गोल नोंदवित आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. 16 व्या मिनिटाला हॉलंडला मिळालेला पहिला पेनल्टी कॉर्नर वाया गेला. सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटामध्ये दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ करत प्रत्येकी एक गोल नोंदविल्याने निर्धारित कालावधीत हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. 47 व्या मिनिटाला कोएन बिजेनने मैदानी गोल करत हॉलंडला पुन्हा आघाडीवर नेले. सामना संपण्यास 23 सेकंद बाकी असताना भारताला सलग तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि हरमनप्रित सिंगने शेवटच्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविला. यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. त्यामध्ये हॉलंडने पाचपैकी चार फटक्यावर गोल नोंदविले तर भारतातर्फे चार फटके वाया गेले आणि विवेक सागर प्रसादने एकमेव फटक्यावर गोल नोंदविल्याने भारताचे पेनल्टी शूटआऊटमधील आव्हान 1-4 अशा गोल फरकाने संपुष्टात आले. आता भारत आणि हॉलंड यांच्यात आणखी एक लढत होत आहे.