वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची हॉकी मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळविली जात आहे. या मालिकेतील झालेल्या तिसऱया सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 4-0 असा पराभव केला. या मालिकेत भारताने द. आफ्रिकेवर 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने मोठय़ा फरकाने यापूर्वी जिंकले आहेत. या मालिकेतील तिसऱया सामन्यात भारतीय संघाने दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. सामन्यातील 18 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि दीपग्रेस एक्काने भारताचा दुसरा गोल केला. या सामन्यातील दुसऱयाच मिनिटाला राणी रामपालने भारताचे खाते उघडले होते. वंदना कटारियाने 20 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून भारताला मध्यंतरापर्यंत 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील तिसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीत उभय संघाकडून गोल नोंदविला गेला नाही. 46 व्या मिनिटाला संगीता कुमारीने मैदानी गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 5-1 तर दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7-0 असा फडशा पाडला होता. आता भारताचा या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ या दौऱयात नेदरलँड्सबरोबर तीन सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळणार आहे.