पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे सरासरी आयुर्मान अधिक
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वातंत्र्यावेळी भारतीयांचे सरासरी आयुर्मान केवळ 32 वर्षे होते. म्हणजेच त्या काळात भारतीय सरासरी 32 वर्षेच जगत हेते. परंतु आता हे सरासरी आयुर्मान वाढून 69 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतीयांचे सरासरी आयुर्मान दुप्पटीपेक्षा अधिक झाले आहे. ही माहिती सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या (एसआरएस) नव्या अहवालातून समोर आली आहे. परंतु जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण अद्याप कमी आहे. जागतिक सरासरी आयुर्मान 72 वर्षे 6 महिने आहे.
एसआरएसचा अब्रिज्ड लाइफ टेबल 2015-19 चा अहवाल अलिकडेच जारी झाला आहे. या अहवालानुसार भारतीयांचे सरासरी आयुर्मान आता 69.7 वर्षे झाले आहे. म्हणजेच प्रत्येक भारतीय सरासरी आता 69 वर्षे 7 महिने इतके जगत आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिला अडीच वर्षे अधिक जगत असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. देशात पुरुषांचे सरासरी आयुर्मान 68 वर्षे 4 महिने आहे, तर महिलांचे सरासरी आयुर्मान 71 वर्षे 1 महिने इतके आहे. तर ग्रामीणांच्या तुलनेत शहरी लोकांचे आयुर्मान अधिक आहे. शहरांमध्ये राहणाऱया लोकांचे सरासरी आयुर्मान 73 वर्षे आहे. तर गावातील लोकांचे सरासरी आयुर्मान 68 वर्षे 3 महिने इतके आहे.
दिल्लीवासीयांचे आयुर्मान अधिक
या अहवालानुसार सर्वाधिक आयुष्य दिल्लीवासीय जगत आहेत. येथील लोकांचे सरासरी आयुर्मान 75 वर्षे 9 महिने आहे. तर सर्वात कमी आयुर्मान छत्तीसगडमधील लोकांचे आहे. तेथे लोक सरासरी 65 वर्षे 3 महिने जगत आहेत. दिल्लीनंतर केरळचा क्रमांक लागतो. केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75 वर्षे 2 महिने इतके आहे.
वयोमानानुसार…
भारतात एक वय गाठल्यावर आणखीन किती वर्षे जगता येते याचा अनुमानही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जन्माला आल्यावर संबंधिताचे सरासरी आयुर्मान 69 वर्षे 7 महिने आहे, परंतु ते मूल 1 वर्षाचे झाल्यावर हे सरासरी आयुर्मान 71.3 वर्षांवर पोहोचते. 5 वर्षांचे वय झाल्यावर तो किंवा ती आणखीन 67.7 वर्षे जगू शकते. अशाचप्रकारे 10 वर्षांचे वय ओलांडल्यावर संबंधित व्यक्ती 72.9 वर्षांपर्यंत जगू शकतो. 20 वर्षे वय झाल्यावर संबंधित व्यक्ती सरासरी 73.3 वर्षांपर्यंत जगू शकतो. तर वयाची तिशी पार केल्यावर व्यक्ती आणखीन 43.9 वर्षे जगू शकतो.
राज्यनिहाय सरासरी आयुर्मान
राज्य पुरुष महिला एकूण
दिल्ली 74.3 77.5 75.9
केरळ 72.3 78.0 75.2
जम्मू-काश्मीर 72.6 76.1 74.2
हिमाचल प्रदेश 69.9 77.1 73.1
पंजाब 71.1 74.7 72.8
महाराष्ट्र 71.6 74 72.7
तामिळनाडू 70.6 74.9 72.6
पश्चिम बंगाल 71.0 73.2 72.1
उत्तराखंड 67.6 73.9 70.6
आंध्रप्रदेश 68.9 71.8 70.3
गुजरात 67.9 72.8 70.2
हरियाणा 67.7 72.6 69.9
कर्नाटक 67.9 71.3 69.5
झारखंड 70.2 68.8 69.4
बिहार 69.6 68.8 69.2
राजस्थान 66.8 71.3 69
आसाम 66.8 68.3 67.5
मध्यप्रदेश 65.2 69.1 67.0
उत्तरप्रदेश 65.0 66.2 65.6
छत्तीसगड 63.7 66.9 65.3