ज्ञानव्यापी मशीद प्रकरणी अर्जावर सुनावणी पूर्ण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाराणसीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून तो आज गुरुवारी दिला जाणार आहे. सर्वेक्षण करणाऱया कोर्ट कमिशनरला हटविण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम बाजूने केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे.
गुरुवारी दुपारी 12 वाजता निर्णय घोषित करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोर्ट कमिशनर म्हणून अजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासंबंधी मुस्लीम पक्षकारांनी आक्षेप घेतला आहे. हिंदू पक्षकारांनी मिश्रा यांचे समर्थन केले असून ते आपले काम प्रामाणिकपणे करत असल्याचा युक्तीवाद केला आहे. मुस्लीम बाजू केवळ वेळकाढूपणा करत आहे, असाही आरोप हिंदू बाजूने केला आहे.
या प्रकरणी मुस्लीम पक्षकारांनी पक्षपाताचा आरोप केला. आपल्या केवळ दोन वकीलांना सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. तर हिंदू बाजूचे 12 वकील उपस्थित होते, असा दावा करण्यात आला. तसेच सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुरावे गोळा करता येऊ शकत नाहीत, असा युक्तीवादही मुस्लीम बाजूने केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
आज गुरुवारी कोर्ट कमिशनरच्या संदर्भात आदेश आल्यानंतर मशिदीचे सर्वेक्षण पुन्हा पुढे सुरु पेले जाईल अशी शक्यता आहे. मशिदीच्या बाहेरच्या परिसराचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, मुस्लीमांनी मशिदीच्या आत प्रवेश देण्यास अटकाव केल्याने आतील भागातील सर्वेक्षण पूर्ण होऊ शकलेले नाही.