वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे उजवे हात मानले जाणारे संजय यादव यांची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. ‘नोकरीसाठी जमीन’ घोटाळय़ात त्यांचा संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर सीबीआयने त्यांना समन्स पाठविले होते. याच घोटाळय़ात लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी आणि त्यांची कन्या मिसा भारती यांचाही हात असल्याचे बोलले जाते.
सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले असून या आरोपपत्रात त्यांच्या कथित घोटाळय़ाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यादव यांनी आरोप नाकारले आहेत.
नोकरीसाठी प्लॉट या घोटाळय़ाप्रकरणी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी तसेच त्यांचे पती लालूप्रसाद यादव आणि 14 अन्य जणांवर खटला दाखल करण्यात आला आहे. रेल्वेने आपल्या कर्मचाऱयांना कमी दरात प्लॉट्स दिले होते. त्या प्लॉट्सच्या मोबदल्यात रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. हा घोटाळा तीन वर्षापूर्वी बाहेर पडला होता. घोटाळय़ाची चौकशी करत असताना सीबीआयच्या हाती एक हार्डडिस्क लागली असून या हार्डडिस्कमध्ये महत्त्वाचे पुरावे असल्याचे प्रतिपादन सीबीआयकडून करण्यात आले आहे. 1 हजार 458 उमेदवारांना या घोटाळय़ांतर्गत रेल्वेत नोकरी दिली गेल्याचा आरोप आहे. 2004 ते 2009 या कालखंडात हा घोटाळा झाला होता. घोटाळय़ात समाविष्ट जमिनीचे क्षेत्रफळ 1 लाख 5 हजार चौरस फूट असल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केले आहे.