‘जीएसएलव्ही एमके3’ 36 विदेशी उपग्रहांसह झेपावणार
जगाला दिसणार भारताची ताकद ः भारतातील सर्वात वजनदार रॉकेटचे व्यावसायिक प्रक्षेपण
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतातील सर्वात दमदार प्रक्षेपक (रॉकेट) ‘जीएसएलव्ही एमके3’ व्यावसायिक बाजारपेठेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज रविवार, 23 ऑक्टोबर रोजी अमेरिकन कंपनी वनवेबसाठी 36 उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यासाठी ‘जीएसएलव्ही एमके3’ झेप घेणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आतापर्यंत 345 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. हे सर्व उपग्रह पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलद्वारे (पीएसएलव्ही) अवकाशात पाठवण्यात आले. या रॉकेटच्या विश्वासार्हतेमुळे आणि किफायतशीरपणामुळे या रॉकेटला जगात वेगळीच प्रति÷ा मिळाली आहे. इस्रोच्या बहुतेक मोहिमांमध्ये पीएसएलव्हीचा वापर केला जातो. मात्र, आता ‘जीएसएलव्ही एमके3’ या रॉकेटच्या माध्यमातून इस्रो ऐतिहासिक भरारी घेणार आहे.
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ‘जीएसएलव्ही एमके3’ या रॉकेटबाबत नुकतीच मोठी घोषणा केली होती. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून उपग्रह संचार कंपनी वनवेबसह 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यास सज्ज झाली आहे. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून भारताचे ‘जीएसएलव्ही एमके3’ रॉकेट जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. ‘जीएसएलव्ही एमके3’च्या सज्जतेची तयारी पूर्ण झाली असून प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोहिमेसाठी क्रायो स्टेज इक्विपमेंट बे (ईबी) जोडणी पूर्ण झाली आहे.
इस्रो हे प्रक्षेपण न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (इस्रोची व्यावसायिक शाखा) आणि अमेरिकन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी वनवेब यांच्यातील कराराचा भाग म्हणून करत आहे. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांसाठी व्हय़ूइंग गॅलरी देखील इस्रोकडून उघडली जाणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच लोकांना प्रक्षेपण अगदी जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
भारताचे सर्वात प्रभावी रॉकेट प्रक्षेपण ब्रिटनमधील नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेडकडून न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे खरेदी केले होते. भारती ग्रुप हा सपोर्टेड वनवेब ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचा समूह आहे. भारतातील सर्वात प्रभावी रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी प्रथमच होत आहे. तसेच, भारताच्या वर्कहॉर्स पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) व्यतिरिक्त इतर रॉकेटचा व्यावसायिक प्रक्षेपणासाठी वापर करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
भारताकडे सध्या तीन प्रक्षेपण वाहने कार्यरत आहेत. यामध्ये पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि ‘जीएसएलव्ही एमके3’ अशा तीन रॉकेटचा समावेश आहे. भारतीय अंतराळ संस्थेने अलीकडेच एक लहान उपग्रह प्रक्षेपण वाहनदेखील विकसित केले आहे. या वर्षाच्या प्रारंभी त्यामधून केलेले पहिले उड्डाण अंशतः यशस्वी झाले होते.
क्षमता सिद्ध करण्यासाठी भारत सज्ज
जगभरात रॉकेट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप वेगाने काम सुरू आहे. रॉकेट तंत्रज्ञान अतिशय कठीण असून लॉन्च व्हेईकल अपयशी देखील होत असतात. अशा परिस्थितीत व्यावसायिक प्रक्षेपण करण्यासाठी विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. भारताला स्पर्धेत स्वतःला प्रस्थापित करायचे असेल तर रॉकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. थर्ड पार्टी लॉन्च सेवा प्रदान करण्यात भारत अभिमान बाळगू शकतो, परंतु त्याला आपली क्षमता वाढवायची आहे.