केरळ उच्च न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था / कोची
केरळमध्ये अलिकडेच एका इसमाने पत्नीची वैद्यकीय तपासणी करणाऱया डॉक्टरला मारहाण केली होती. संबंधित इसमाकडून डॉक्टरने पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी डॉक्टरला मारहाण करणाऱया इसमाला अटकपूर्व जामीन देण्यास केरळ उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच रुग्णाला स्पर्श न करता वैद्यकीय तपासणी करणे डॉक्टरांसाठी अवघड बाब असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
आरोपीला जामीन मंजूर केल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यातून रुग्णांवर उपचार करण्यासाठी बांधील असलेल्या डॉक्टरांना संरक्षण मिळणार नाही तसेच सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येईल अशी न्यायाधीश ए. बदरुद्दीन यांनी अटकपूर्व जामीन नाकारताना म्हटले आहे.
रुग्णांवर उपचार करण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॉक्टरांनी स्वतःची शक्ती आणि वेळ खर्ची घातलेली असते. डॉक्टर रुग्णांना स्पर्श न करता वैद्यकीय तपासणी करू शकत नाही. एखाद्याला स्वतःवर उपचार करवून घ्यायचे असल्यास त्याने डॉक्टरांच्या स्पर्शावर आक्षेप घेऊ नये. स्पर्श न करता उपचार करणे डॉक्टरांसाठी अवघड बाब आहे. रुग्णाच्या हृदयाचे ठोके तपासण्यासाठी त्याच्या छातीच्या डाव्या भागावर स्टेथोस्कोप लावावा लागतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी तक्रारदार डॉक्टर ऑन-कॉल डय़ुटीवर होते, त्यावेळी त्यांनी आरोपीच्या पत्नीची तपासणी केली होती. परंतु डॉक्टराने पत्नीला स्पर्श केल्याचे म्हणत आरोपीने डॉक्टराच्या कानशिलात लगावली होती. या प्रकारानंतर आरोपीवर विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण केरळ उच्च न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन नाकारला आहे.