दोन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत, वॅग्नरचे 4 बळी, विलियम्सन सामनावीर, हॅरी ब्रुक मालिकावीर
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंडने मंगळवारी येथे दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळवित दोन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखल्यामुळे इंग्लंडचे मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. या सामन्यात फॉलोऑन स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर हा विजय मिळवला. कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑन घेतल्यानंतर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे. न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला ‘सामनावीर’ तर इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून आघाडी मिळवली होती. बऱ्याच वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची संधी इंग्लंडला उपलब्ध झाली होती. पण दुसऱ्या कसोटीतील खेळाचा शेवटचा दिवस न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी गाजवला. या सामन्यातील मंगळवारच्या शेवटच्या दिवशी विजयाचे पारडे दोन्ही संघांच्या बाजूने झुकत होते. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने चिवट फलंदाजी करत 95 धावांची खेळी केली. रुटला कर्णधार स्टोक्स आणि फोक्स यांच्याकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. पण न्यूझीलंडच्या नील वॅग्नर आणि कर्णधार साऊदी यांनी भेदक गोलंदाजी करत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून देत ही मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळविले.
या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिला डाव 8 बाद 435 धावावर घोषित केल्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावात आटोपल्याने इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत 483 धावा जमवत इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 258 धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात केन विलियम्सनने शानदार शतक (132) तसेच टॉम लॅथम, देव्हॉन कॉनवे, ब्लंडेल आणि मिचेल यांनी अर्धशतके झळकविली.
इंग्लंडने 1 बाद 48 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला मंगळवारी पुढे सुरुवात केली पण कर्णधार साऊदीने नाईट वॉचमन रॉबिनसनला 2 धावावर ब्रेसवेलकरवी झेलबाद केले. मॅट हेन्रीने सलामीच्या डकेटला झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 33 धावा जमवल्या. वॅग्नरने पॉपला बाद करून इंग्लंडवर अधिकच दडपण आणले. पॉपने 2 चौकारासह 14 धावा जमवल्या. या मालिकेत धावांचा रतिब घालणारा हॅरी ब्रुक एकेरी धाव घेण्याच्या नादात आपले खाते उघडण्यापूर्वीच धावचित झाला. न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण अत्यंत दर्जेदार झाले. इंग्लंडची यावेळी स्थिती 5 बाद 80 अशी केविलवाणी होती. ब्रुक बाद झाल्याने न्यूझीलंडसमोरील महत्त्वाचा अडथळा दूर झाला. या कसोटीत ब्रुकने पहिल्या डावात शानदार शतक (186) झळकवले होते. इंग्लंडला यावेळी विजयासाठी आणखी 178 धावांची जरुरी होती.
माजी कर्णधार रुट आणि कर्णधार स्टोक्स यांनी एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत सहाव्या गड्यासाठी 121 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्याने इंग्लंडचा संघ ही कसोटी जिंकणार असे वाटत होते. रुटने कसोटीतील आपले 57 वे अर्धशतक 51 चेंडूत झळकवले. स्टोक्सला दुखापतीमुळे जलद धावा घेता आल्या नाहीत. त्याने 116 चेंडूत केवळ 33 धावा जमवताना 6 चौकार ठोकले. वॅग्नरने स्टोक्सला लॅथमकरवी झेलबाद केले. स्टोक्स बाद झाल्यानंतर रुट अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. वॅग्नरच्या चेंडूवर तो ब्रेसवेलकरवी झेलबाद झाला. रुटने 183 मिनिटे खेळपट्टीवर राहून 3 षटकार आणि 8 चौकारासह 113 चेंडूत 95 धावा जमवल्या. रुटचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. वॅग्नरने स्टोक्स आणि रुट यांना पाठोपाठ बाद केल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. दरम्यान बेन फोक्सने ब्रॉडला साथीला घेत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. हेन्रीने ब्रॉडला बाद केले. त्याने 9 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. कर्णधार साऊदीने फोक्सला वॅग्नरकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला पुन्हा विजयाच्या दिशेने नेले. फोक्सने 57 चेंडूत 4 चौकारासह 35 धावा जमवल्या. फोक्स बाद झाला त्यावेळी इंग्लंडची स्थिती 9 बाद 251 अशी होती. इंग्लंडला विजयासाठी केवळ 7 धावांची तर न्यूझीलंडला विजयासाठी केवळ एक गडी बाद करण्याची गरज होती. इंग्लंडचा शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसन फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. वेग्नरच्या या षटकामध्ये अँडरसनने एक चौकार ठोकल्याने इंग्लंडला विजयासाठी केवळ 2 धावांची जरुरी होती पण वॅग्नरच्या या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ब्लंडेलने डावीकडे झेपावत अँडरसनचा अप्रतिम झेल घेतल्याने इंग्लंडला हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. न्यूझीलंडने इंग्लंडवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळवत ही मालिका बरोबरीत राखली. न्यूझीलंडतर्फे नील वॅग्नरने 62 धावात 4, साऊदीने 45 धावात 3, हेन्रीने 75 धावात 2 गडी बाद केले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये फॉलोऑन स्वीकारल्यानंतर चौथ्या डावात विजय मिळवणारा न्यूझीलंड हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम इंग्लंडने दोनवेळा तर भारताने एकदा केला आहे. 2001 साली कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून फॉलोऑन स्वीकारल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा 171 धावांनी पराभव केला होता. 2017 पासून न्यूझीलंडने घरच्या मैदानावर अद्याप एकदाही कसोटी मालिका गमवलेली नाही.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 87.1 षटकात 8 बाद 435 डाव घोषित, न्यूझीलंड प. डाव 53.2 षटकात सर्वबाद 209, न्यूझीलंड दु. डाव 162.3 षटकात सर्वबाद 483, इंग्लंड दु. डाव 74.2 षटकात सर्वबाद 256 (रुट 95, क्रॉले 24, डकेट 33, रॉबिनसन 2, पॉप 14, ब्रुक 0, स्टोक्स 33, फोक्स 35, ब्रॉड 11, अँडरसन 4, लिच नाबाद 1, वॅग्नर 4-62, साऊदी 3-45, हेन्री 2-75).