राज्यात एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान : 13 मे रोजी मतमोजणी : आचारसंहिता लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
कमालीची उत्सुकता असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी अखेर बुधवारी निवडणुकीचे बिगुल वाजले. निवडणूक आयोगाने रुपरेषा जाहीर केल्यानंतर बुधवारपासूनच राज्यात आचारसंहिता जारी झाली आहे. राज्यातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे.
नवी दिल्ली येथे सकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. तर अर्ज भरणा करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असेल. 21 एप्रिल रोजी अर्ज छाननी होणार असून माघार घेण्याची अंतिम मुदत 24 एप्रिल असेल. या निवडणुकीसाठी बुधवार दि. 10 मे 2023 रोजी मतदान होणार असून निकाल शनिवार, 13 मे रोजी जाहीर होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कालावधी 24 मे रोजी संपणार आहे. त्याआधी निवडणुका होऊन नवी विधानसभा अस्तित्वात आणावी लागणार आहे. त्यानुसार निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्याकरिता निवडणूक आयोग सज्ज आहे. निवडणूक आचारसंहिता देखील जारी झाली असून त्यानुसारच राजकीय पक्षांना कार्यक्रम करावे लागणार आहेत. सरकारला देखील कोणत्याही योजनांची घोषणा किंवा विकासकामांचे लोकार्पण करता येणार नाही. यासंबंधी आयोगाने मार्गदर्शी सूत्रे देखील जारी केली आहेत.
2023 च्या निवडणुकीवेळी प्रथमच मतदारांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. 1 एप्रिल रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यात एकूण 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामध्ये 2.62 कोटी पुरुष तर 2.59 महिला मतदारांचा समावेश आहे. यावेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी मतदारांनी नोंदणी केली आहे. राज्यात 4,699 तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात 58,282 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 12 हजार केंद्रे अतिसंवेदनशील असतील. शहरी भागात 24,063 आणि ग्रामीण भागात 34,219 मतदान केंद्रे असतील.
अॅपद्वारे तक्रार करता येणार
नि:पक्ष, आणि प्रलोभनमुक्त निवडणुका घेण्यासाठी नागरिकांची जागरुकता आणि सहकार्य महत्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या cVigil App द्वारे नागरिक कोणत्याही निवडणूक गैरप्रकरांची तक्रार आयोगाकडे करू शकतात. प्रत्येक तक्रारीवर 100 मिनिटांच्या आत प्रतिसाद दिला जाईल. निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यभरात 2,400 स्टॅटीक सर्व्हिलन्स टीमची नजर असेल. 19 जिल्ह्यांमधील 171 आंतरराज्य चेकपोस्टवरही करडी नजर असेल, अशी माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
विधानसभेतील सध्याचे बलाबल
विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकात सत्ताधारी भाजपचे 119 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसजवळ 75 आणि निजदजवळ 28 आमदारांचे संख्याबळ आहे. स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला 113 जागा जिंकणे आवश्यक आहे. प्रमुख तिन्ही राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाला बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, निवडणूक निकालानंतरच मतदार कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालणार, हे स्पष्ट होईल.
2018 च्या निवडणुकीवर एक नजर…
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी 12 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. तर 15 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. भाजने 105 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळविली. तर काँग्रेसला 79 आणि निजदला 39 जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने निजदशी युती केली. अन् एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. 14 महिन्यांनंतर राजकीय परिस्थिती बदलल्याने काँग्रेस-निजदमधील 17 आमदारांनी राजीनामा देत भाजपप्रवेश केला. जुलै 2019 मध्ये भाजपने सरकार स्थापन केले. येडियुराप्पा मुख्यमंत्री बनले. 23 महिन्यानंतर येडियुराप्पांना राजीनामा द्यावा लागला आणि जुलै 2021 मध्ये बसवराज बोम्माई मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
निवडणूक कार्यक्रम…
13 एप्रिल अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
20 एप्रिल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस
21 एप्रिल उमेदवारी अर्जांची छाननी
24 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
10 मे मतदान
13 मे मतमोजणी/निकाल
निवडणुकीची वैशिष्ट्यो…
► 80 वर्षांवरील मतदारांना घरातून मतदान करता येणार
► 80 वर्षांवरील मतदार पोस्टल बॅलेटद्वारे हक्क बजावणार
► राज्यात 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 12,15,142
► राज्यातील तृतीयपंथी मतदारांची नोंदणी 4,699 वर
► 1,320 मतदान केंद्रांवर केवळ महिला कर्मचारी असणार
► प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे 9,17,241 मतदार
टक्का वाढवण्यासाठी मतदान बुधवारी!
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी बुधवार हा वार निश्चित करताना मतदानाचा टक्का वाढवण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवले आहे. मतदारांच्या मोठ्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सोमवारी किंवा शुक्रवारी नव्हे तर बुधवारी निवडणुका निश्चित केल्या आहेत. सोमवार किंवा शुक्रवार या दिवशी मतदान घेतल्यास मतदार साप्ताहिक किंवा शनिवार-रविवार अशा सुट्ट्यांना जोडून बाहेरगावी जाण्याचे नियोजन करून मतदानाच्या बहुमोल हक्कापासून वंचित राहतात. परंतु बुधवारी मतदान घेतल्याने ही शक्यता कमी झाली आहे, असे निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले. हे पाऊल मतदानासाठी अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि मतदारांच्या उदासीनतेला आळा घालण्यासाठीच्या आयोगाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूण नोंदणीकृत मतदार 5,21,73,579
पुरुष मतदार 2,62,42,561
महिला मतदारांचा 2,59,319
तृतीयपंथी मतदार 4,699
12 ओखपत्रांचाही मतदानासाठी करता येणार वापर
मतदार ओळखपत्र नसल्यास इतर 12 ओळखपत्रांचा वापर करून देखील मतदानाचा हक्क बजावण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. आधारकार्ड, नरेगा जॉब कार्ड, फोटो असणारे बँक पासबूक किंवा पोस्ट पासबूक, कामगार खात्याकडून वितरीत होणारे आरोग्य स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयकडून वितरीत होणारे स्मार्टकार्ड, फोटो असणारे पेन्शन पत्रक, केंद्र, राज्य सरकारच्या औद्योगिक केंद्रांकडून वितरीत केलेले ओळखपत्र, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्यांना वितरीत होणारे ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय खात्याकडून दिले जाणारे विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र यांचा वापर करूनही मतदान करता येणार आहे.
पक्ष, उमेदवारांसाठी आचारसंहितेची मार्गदर्शिका…
► कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने धर्म, जात, भाषा आणि समुदायांविषयी द्वेषभावना पसरवू नये.
► विरुद्ध पक्षांचे धोरण आणि कार्यक्रमांवर टीका करता येईल. वैयक्तिक टीका करू नये.
► जात, धर्माच्या आधारे मतयाचना करू नये. धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी करू नये.
► परवानगीशिवाय कोणाच्याही वैयक्तिक मालमत्तेचा वापर करू नये.
► कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणू नये.
► सभा घेण्यापूर्वी सभेची वेळ आणि ठिकाण यांची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी.
► सभा घेण्याचे ठिकाण निर्बंधित क्षेत्र नसल्याची खातरजमा उमेदवार, पक्षांनी करून घ्यावी.
► सभेसाठी लाऊड स्पीकरचा वापर करायचा असेल तर संबंधीत खात्याकडून आगाऊ परवानगी घ्यावी.
► सभेच्या ठिकाणी कोणीही अडथळा आणत असेल तर तेथे असणाऱ्या पोलिसांची मदत घ्यावी.
► मिरवणूक आयोजिणाऱ्या पक्षाने किंवा उमेदवाराने मिरवणुकीचा मार्ग, वेळा व इतर माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देऊन परवानगी घ्यावी.
► मिरवणुकीवेळी स्थानिक नियमांचे, रहदारी नियमांचे पालन करावे.
► मिरवणुकीवेळी अनपेक्षित उपकरणांचा वापर करू नये.
► इतर राजकीय पक्षातील सदस्यांचे प्रतिमा नेणे, पक्ष किंवा त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा, प्रतिकृतींचे सार्वजनिकरित्या किंवा इतर स्वरुपात दहन करू नये.