पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अद्यापही केरळात पोहचला नसून, देवभूमीला अद्याप मान्सूनची प्रतीक्षा आहे. दरम्यान, केरळात सर्वदूर पाऊस सुरु असला तरी, येत्या 2 ते 3 दिवसांत येथे दमदार पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभाग येथे लवकर मान्सूनचे आगमन जाहीर करण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून केरळात 1 जूनला दाखल होतो. यंदा मात्र तो 4 जूनपर्यंत येण्याची शक्यता मान्सून विभागाने वर्तविली होती. परंतु, अद्यापही मान्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव,लक्षद्वीप बेटांपर्यंत तर दक्षिण बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचला आहे. यादरम्यान, दक्षिणपूर्व अरबी समुद्रात सोमवारी हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार असून, पुढे याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पूर्वमध्य बंगालच्या उपसागरातही म्यानमार किनारपट्टीजवळ हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे मान्सूनवर परिणाम होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केरळात पाऊस
दरम्यान, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महेच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. मात्र, दमदार पावसाची अद्यापही या भागाला प्रतीक्ष आहे. हा पाऊस असाच चालू राहिल्यास मान्सून या भागात दाखल झाल्याचे लवकरच हवामान विभाग जाहीर करु शकते.
अरबी समुद्रात वादळाची चिन्हे
अरबी समुद्रात सोमवारी हवेची दोणीय स्थिती निर्माण होणार असून, पुढे याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होईल. या क्षेत्राची तीव्रता वाढून याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास अरबी समुद्रातील या वर्षीचे हे पहिले वादळ ठरेल. या क्षेत्रामुळे मान्सूनच्या पश्चिम शाखेच्या वाटचालीला अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत. या क्षेत्राच्या प्रभावामुळे गुजरात, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट असून, ती 8 जूनपर्यंत राहणार आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, तेलंगणाच्या भागातही पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहील.
कोकण गोव्यात तुरळक पावसाची शक्यता
पुढील तीन दिवस कोकण गोव्यात तुरळक पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडय़ात हवामान कोरडे राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.