सांगरूळ, वार्ताहर
Kolhapur News : नियोजनबद्ध काम ठेवत नाविन्याचा अंगीकार करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा.शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत करवीर तालुक्याची चमकदार कामगिरी करा .करवीर पंचायत समितीच्या वतीने तज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने नेहमी सहकार्य करू अशी ग्वाही करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी दिली.करवीर पंचायत समितीच्या वतीने राजवीर पब्लिक स्कूल वाशी येथे झालेल्या तालुकास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत करवीर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते.
२०२४ ला होणाऱ्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत करवीर तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा सराव परीक्षा घेण्याची गरज असून त्याचे नियोजन तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या सहकार्याने करवीर पंचायत समितीने केले आहे.तालुक्यातील प्रत्येक शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नियोजन बद्द मार्गदर्शन करून जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात पंचायत समितीच्या माध्यमातून यासाठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना तज्ञ मार्गदर्शक धनाजी पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचे करवीर तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील आम्ही तज्ञ मार्गदर्शकांची टीम तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली.करवीर तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रत्येक शाळेने आपला आपला वाटा उचलावा मार्गदर्शनासाठी आम्ही सदैव सहकार्य करू अशी ग्वाही तज्ञ मार्गदर्शक उत्तम पाटील यांनी दिली.
दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत सतीश चव्हाण ,उत्तम पाटील, धनाजी पाटील,रघुनाथ पारळे ,दिनकर परीट ,श्रीकांत चव्हाण ,संदीप पाटील,राजेंद्र तौंदकर,आनंदा पाटील ,मारुती लांबरे ,बाबुराव निकम, विद्याधर पुजारी, सखाराम राजुगडे ,बाबा सुर्वे, पांडुरंग कांबळे, विजय सुतार, संजय लोंढे, अरुण हळदकर ,नकुशी देवकर, सुरेश जाधव यांनी भाषा गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाचे शिक्षकांना मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता गायकवाड उपस्थित होत्या.तज्ञ मार्गदर्शक सतीश चव्हाण यांनी आभार मानले.
तज्ञ मार्गदर्शकांची प्रामाणिक धडपड
शिष्यवृत्ती परीक्षेत करवीर तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवून तालुका जिल्ह्यामध्ये प्रथम स्थानावर आणण्यासाठी करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.प्राथमिक शाळातील ज्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यार्थी जिल्हा व राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत अशा २० तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची टीम स्वयंस्फूर्तीतून तयार झाली असून, आपला तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आणण्यासाठी इतर शाळातील विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून विनामोबदला गरज पडली तर शालेय वेळापत्रकाच्या बाहेर काम करून मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. केवळ आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही यासाठी संपूर्ण तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी चमकावेत यासाठी यासाठी हे शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.