‘लोकमान्य’च्या म्हापसा क्षेत्रीय विभागाने गाठला १००० कोटींच्या ठेवीचा टप्पा
म्हापसा : लोकमान्य सोसायटी निरंतर कार्यरत असून कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. किरण ठाकुर, संस्थेचे संस्थापक मंडळ तसेच पदाधिकारी यांनी लोकमान्य सोसायटीला खऱ्या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली आहे. यात पैशाचे मोल आहेच, परंतु गोव्यातील लोकांनी दाखविलेला विश्वास अनंत कोटींचा आहे. पैसा उभा केला पाहिजे. जनताजनार्दनाकडून विश्वासाने गोळा केलेला पैसा जनताजनार्दनाच्या कल्याणासाठी राबणारी संस्था म्हणून लोकमान्य संस्थेकडे गोमंतकीय जनता मोठ्या आदराने बघते. लोकमान्य ही भायली नव्हे तर ती आपली संस्था आहे असा सार्थ अभिमान गोंयकाराना मनापासून वाटतो. मला वाटते संस्थेच्या यशाची ही गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
लोकमान्य मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीच्या म्हापसा क्षेत्रीय विभागाने १००० कोटींच्या ठेवीचा टप्पा गाठला. यानिमित्त म्हापसा अनंत्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. मंत्री श्रीपाद नाईक व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते केक कापून व सांस्कृतिक परंपरेने तुळसी वृंदावनाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, संचालिका सई ठाकुर-बिजलानी, अभिजित दीक्षित, कुमार प्रियोळकर उपस्थित होते.
लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर म्हणाले, आज हा लोकमान्य परिवाराचा उत्सव आहे. जिथे सहकार नव्हते त्या ठिकाणी सहकार घडविण्याचा आदर्श आपण करीत आलो आहोत.