कुस्तीगीर परिषदेच्या पत्रामुळे आखाडय़ात खळबळ
फिरोज मुलाणी / सातारा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन उठलेल्या वादाचा धुरळा खाली बसायला तयार नाही. स्पर्धा काही तासावर आली असतानाच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने काढलेल्या पत्रामुळे आखाडय़ात खळबळ उडाली आहे. स्पर्धेकरीता दोन्ही गटांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादग्रस्त केसरी ठरतेय की काय असा प्रश्न कुस्तीशौकीनांच्या मनात निर्माण झाला आहे.
65 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अस्थायी समितीच्या माध्यमातून स्पर्धा आयोजनाची जबाबदारी घेतलेल्या दोन्ही गटात आयोजनाबाबत वाद सुरू आहे. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देखील या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे स्पर्धा निर्विवादपणे पार पडेल असे वाटले होते. अस्थायी समितीच्या माध्यमातून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धा आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची जय्यत तयारी सुरु केली आहे. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या लोगोचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तयारीला वेग आल्याने स्पर्धा रंगतदार होईल यासाठी कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचवली आहे. मात्र स्पर्धेच्या तोंडावरच आज कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी काढलेल्या पत्रकामुळे स्पर्धेच्या आयोजनाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने आखाडय़ात खळबळ उडाली आहे.
लांडगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 10 ते 14 अखेर कोथरूड पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. स्पर्धा आयोजकांना कुस्तीगीर परिषदेने नियम, अटी व शर्तीसह पत्र दिले होते. आयोजकांनी परिषदेला या पत्राचे उत्तर दिलेले नाही. आयोजकांना परिषदेच्या नियम अटी मान्य नाहीत असे सिध्द होते. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मान्यता दिलेली नाही. राज्यातील कुस्तीगीर आणि जिल्हा तालिम संघांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पत्रात केले आहे. अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा लवकरच जाहीर करण्यात येईल असे लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.
आयोजनातील वादविवादाने 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दररोज नवनवीन वळणे घेत आहे. अधिकृत आणि अनाधिकृत या डावावर दोन्ही गटात डाव प्रतिडाव सुरू आहेत. आखाडय़ातील लढतीत कोण महाराष्ट्र केसरी होणार हे दूर असले तरी आयोजनाच्या लढाईचे मैदान कोण मारणार याबाबत कुस्तीशौकीनांना उत्सुकता लागली आहे.
दोन्ही गटांचा इशारा कुस्तीगीरांची कोंडी
भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने अस्थायी समितीच्या माध्यमातून 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यासाठी राज्यातील तालिम संघ, आणि महापालिका संघांनी अधिकृत प्रवेशिका पाठवावी. जे संघ स्पर्धेत सहभागी होणार नाहीत त्यांच्या संल्गनतेबाबत विचार केला जाईल असा इशारा अस्थायी समितीने दिला आहे. तर 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत नाही याची नोंद राज्यातील जिल्हा शहर तालिम संघानी घ्यावी, असे आवाहन कुस्तीगीर परिषदेने केले आहे. दोन्ही गटांनी दिलेल्या इशाऱयामुळे कुस्तीगीरांची मात्र कोंडी झाली आहे.