वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे सुरू असलेल्या सिंगापूर स्मॅश आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा आणि जी. साथीयान यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. तथापि मनिका बात्राला महिला दुहेरीतही हार पत्करावी लागली.
महिला दुहेरीच्या सामन्यात चीनच्या मेंग चेन आणि वेंग यांनी भारताच्या मनिका बात्रा व अर्चना कामत यांचा 3-2 अशा सेट्समध्ये (2-11, 6-11, 15-13, 12-10, 11-6) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. हा सामना 42 मिनिटे चालला होता. दरम्यान मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या हिना हयाता आणि हेरीमोटो यांनी भारताच्या मनिका बात्रा व जी. साथीयान यांचा 3-2 (9-11, 9-11, 11-8, 11-5, 11-7) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ही लढत 52 मिनिटे चालली होती. तत्पुर्वी मनिका बात्रा आणि साथीयान यांनी चेयू क्लेरन्स आणि जीयान झेंग यांचा 3-1 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. या स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा, जी. साथीयान तसेच शरथ कमल यांना एकेरीच्या पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली. तसेच पुरुष दुहेरीत भारताच्या हरमित देसाई आणि मानव ठक्कर यांचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले.