ऑनलाईन टीम/तरुण भारत :
चेक बाऊन्स प्रकरण : चेक बाऊन्स प्रकरणी नीरजकुमार निराला यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस देऊनही काही फरक पडला नाही. त्यामुळे निराला यांनी कंपनीचे सीईओ राजेश आर्य यांच्यासह इतर सात पदाधिकार्यांवर तसेच या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध खटला दाखल केला आहे.
न्यू उपजवर्धक इंडिया लिमिटेडने निराला यांच्या एजन्सीसोबत उत्पादनासाठी ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा करार करून मालही दिला. नीरज कुमार निराला यांनी आरोप केला आहे की, कंपनीने उत्पादनाची विक्री करताना सहकार्य केले नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात खत शिल्लक राहिले.
नीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने उर्वरित खत काढून घेतले आणि त्याबदल्यात त्यांच्या एजन्सीच्या नावे 30 लाखांचा धनादेशही देण्यात आला. मात्र नीरजकुमार निराला यांनी धनादेश बँकेत जमा केल्यावर तो बाऊन्स झाला. त्यामुळे त्यांनी हा गुन्हा दाखल केला.
या उत्पादनाची जाहिरात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केली असल्यामुळे त्याच्या विरुद्ध ही खटला दाखल केला आहे. हे प्रकरण बेगुसराय येथील मुख्य न्यायदंडाधिकारी रुपमा कुमारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 28 जून ही तारीख निश्चित केली आहे.