शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आणि पक्षाच्या इतर सहकाऱ्यांवर “चिखलफेक” केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somayya ) यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवली जाईल असे स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनी अलीकडेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) कोविड -19 केंद्रांच्या उभारणीच्या व्यवहारात अनियमितता केल्याचा आरोप केला होता.
हे ही वाचा >>> उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत जम्मूमधून पदक्रमण
आपल्या ट्विटर हँडलवर (Tweeter) पोस्ट लिहिताना ते म्हणाले, “भाजपचे किरीट सोमय्या उर्फ पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. तसेच गेल्या काही काळापासून शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. लवकरच त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यासाठी मी प्रक्रिया सुरु केली आहे.” असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना काळात जंबो कोव्हिड सेंटरच्या स्थापनेत ₹ 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मुंबई महापलिकेने संजय राऊत यांच्या “भागीदारीतील” कंपनी स्थापन होण्याआधीच तीला कंत्राट देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
“BMC ने 24 एप्रिल 2020 रोजी संजय राऊत यांचे पार्टनर असलेले सुजीत पाटकर यांच्या लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांना ₹ 100 कोटीं रुपयांच्या कोविड सेंटरचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला.” असे सांगून किरिट सोमय्या यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पोस्ट केली.
मुंबई शहरातील अशा दोन कोव्हीड सेंटरवर मनुष्यबळ पुरविण्यासाठी केवळ ₹ 33.13 कोटी खर्च करण्यात आले असल्याचे सांगत बीएमसीने सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. बीएमसीचे प्रमुख इकबालसिंग चहल यांनी म्हटले आहे की, दहिसर आणि एनएससीआय जंबो कोविड-19 केंद्रांवर मनुष्यबळ पुरवण्यासाठी एकूण ₹ 33.13 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप निराधार आहे.”