शासकीय, निशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फुट
कोल्हापूर मनपातील सर्व कर्मचारी आजपासून होणार कामावर हजर
कोल्हापूर प्रतिनिधी
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपातून कोल्हापूर महापालिकेची कर्मचारीही सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती, कामगार कर्मचारी फेडरेशनचे पदाधिकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात बुधवारी रात्री उशीरा चर्चा झाली. यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनानंतर बैठक घेण्याचे आश्वासन फेडरेशनला दिले. यावर फेडररेशनने संप स्थगित केला आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकासह राज्यातील सर्व महापालिकेतील कर्मचारी संपातून बाहेर पडल्या आहेत.
राज्य कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी संपाचे हत्यार उपासले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे सुमारे 3500 कर्मचारी सहभागी आहेत. बुधवारी दुसऱ्या दिवशीही संप कायम होता. यामुळे महापालिकेची यंत्रणा कोलमडली होती. कचरा उठाव झाला नसल्याने शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले. तुंबलेल्या गटारी, ड्रेनेजलाईन सफाई करण्यास कोणी फिरकले नाही. सफाई कर्मचारीही संपात असल्याने रस्त्यावरील सफाई झाली नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य झाले होते. यासह जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास अडचणी झाल्या. मनपा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एकूणच राज्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती, कामगार कर्मचारी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी सकारात्मक चर्चे झाली. फडणवीस यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत अधिवेशनानंतर सविस्तर बैठक घेण्याची लेखी ग्वाही दिली. फेडरेशनने राज्यातील महानगरपालिकेतील कामगार प्रतिनिधींशी चर्चा करुन संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापूर महापालिकेतील सर्व कर्मचारी आज गुरूवारी कामावर हजर होणार आहेत.
महापालिका फेडरशनने संप स्थगित केल्याने कोल्हापूर महापालिकेची कर्मचारी आज गुरूवारपासून कामावर हजर होतील. राज्य कर्मचारी यांच्या संपाला काळ्या फिती लावून पाठींबा कायम राहिल. यासंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
अजित तिवले, जनरल सेक्रेटरी, महापालिका
राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात फूट
दोन दिवस जुनी पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकसंघाने रस्त्यावर उतरले होते. बुधवारी यामधून राज्यातील महापालिका, नगरपालिकेचे कर्मचारी बाहेर पडल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याची चर्चा आहे.