एकीकडे अमर्याद आकाराच्या ब्रम्हांडावर संशोधन सुरु असताना मोहरीच्या दाण्यासारखी छोटी वस्तूही संशोधकांच्या दृष्टीतून निसटलेली नाही. मोहरीचे औषधी गुणधर्म नव्याने तपासले जात आहेत. मोहरीचे दाणे हे आपल्या नित्य परिचयाचे आहेत. फोडणीसाठी, लोणच्यात घालण्यासाठी, किंवा लेप तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोच. पण नव्या संशोधनानुसार सध्याच्या काळात जे ‘लाईफस्टाईल डिसीजेस’ किंवा जीवनशैली विकार मोठय़ा प्रमाणात उद्भवत आहेत, त्यांच्यावरही हा मोहरीचा दाणा गुणकारी आहे, असे दिसत आहे.
सध्या भारतात सर्वात चर्चेत असणारा आणि जवळपास प्रत्येक घरात एकाला तरी लागलेला मधुमेह (डायबेटिस) हा विकार आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अतिताणतणाव आणि वेळीअवेळी अतिखाणे यामुळे तो जडतो. भारतात किमान 25 कोटी लोक या विकाराने ग्रस्त असावेत, असे म्हटले जाते. त्यामुळे त्यावर सर्वाधिक संशोधन होत असून आता घरगुती पदार्थांवरही प्रयोग होत आहेत. त्यातच मोहरी किंवा ब्रेसिका कँपेस्ट्रीसचा समावेश आहे.
मोहरीचे दाणे रक्तातील साखर कमी करणे, अस्थम्याचा त्रास कमी करणे, रजोनिवृत्तीच्या (मेनापॉज) काळातील समस्यांचे निवारण, रक्तदाब (ब्लडपेशर) वर नियंत्रण इत्यादीसाठी बरेच उपयुक्त आहेत असे आढळून आल्याने त्यांच्यापासून औषधे कशी बनविता येतील यावर संशोधन सुरु आहे. मोहरीच्या कोवळय़ा पानांची भाजी (सरसो का साग) वजन घटविण्यासाठी उपयुक्त ठरते हे सर्वपरिचित आहे. मोहरीचे तेल आणि दाण्यांचे सेवनही या उद्देशासाठी केले जाऊ शकते. मोहरीच्या दाण्यांमध्ये तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि सेलेनियम ही जीवनोपयोगी द्रव्ये मोठय़ा प्रमाणात असतात असे दिसून आल्याने नित्य आहारात मोहरीचा उपयोग किती महत्वाचा आहे यावर नव्याने प्रकाश पडत आहे.