बिल्वदल परिवारातर्फे 6 व्या किर्तन संमेलनाचा समारोप सोहळा
वार्ताहर /माशेल
स्वातंत्र्यपुर्व काळात भोळय़ा शोषित जनतेला एकत्रित करण्याचे काम कीर्तनकाराच्या प्रबोधनातून झालेले आहे. देशभरात सुमारे सात हजारहून कीर्तने सादर करणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर तोच वसा पुढे नेत आहे. देवदेवतांचे गुणगान व समाज प्रबोधन कार्यासाठी प्रेरीत कीर्तन संमेलनातून युवा कीर्तनकार घडावेत असे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी खांडोळा माशेल येथील बिल्वदल परिवाराच्या 6 व्या कीर्तन संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना काढले.
सांखळी येथील बिल्वदल परिवार आणि श्री संस्थान गणपती मंदिर खांडोळा यांच्या सहकार्याने आयोजित 6 वे कीर्तन संमेलन रविवारी खांडोळा येथील श्री गणपती मंदिराच्या सभागृहात झालेल्या समारोप सोहळयात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री गणपती मंदिर खांडोळाचे अध्यक्ष प्रितम खांडेपारकर, बिल्वदल परिवाराचे अध्यक्ष तथा दै. तरूण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, राजेश गायतोंडे, ऍड करूणा बाक्रे, समीर देसाई उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वीजमंत्री ढवळीकर म्हणाले आजच्या घडीला कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कीर्तनकारांची फळी तयार होत असून किर्तनाच्या माध्यमातून बालवयात समाजप्रबोधनाची गोडी निर्माण करण्याचे थोर काम ते करीत आहे. वीजमंत्री ढवळीकर यांच्याहस्ते ज्येष्ठ राष्टीय कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांना बिल्वदल परिवारातर्फे देण्यात येणारा मानाचा नारदमुनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन बिल्वदल परिवाराचे कोषाध्यक्ष समीर देसाई यांनी केले.
प्रास्ताविकपर भाषणात सागर जावडेकर म्हणाले ज्ञानाचे भंडार म्हणजे कीर्तन आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेली ही कला लोप पावू नये, त्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गोमंतकीय कीर्तनकारांना उज्ज्वल भविष्य आहे. आज गोमंतकीय कीर्तनकार पद्मश्रीपर्यंत पोचलेला असल्याचे उदाहरण दिले.
मंत्री ढवळीकर यांच्याहस्ते देवस्थनाचे अध्यक्ष प्रितम खांडेपारकर, पं. तुळशीदास नावेलकर, नारायण बांदेकर, सोहम बाक्रे, दत्तराज शेटय़े, प्रदीप शिलकर, प्रज्वलीता गाडगीळ, राजेश गायतोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
पैसा, धन काही नको..आपल्या हातून वाईट घडू नये हाच आशिर्वाद द्या!
पुरस्कार स्वीकारताना नेहमी श्रोते व रसिकांच्या गराडयात वावरणारे राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर भावूक झाले. बिल्वदलच्या नारदमुनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रोत्याकडून पैसे नको…. धन नको…. आयुष्यात आपल्याकडून समाजासाठी काहीही वाईट घडू नये असा आशिर्वाद बहाल करा असे आवाहन श्रोत्यांना केले. बिल्वदल परिवाराचे आभार व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
किर्तनकारांना श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद
कीर्तन संमेलनाचा प्रारंभ डॉ. कु उर्वी फडके यांच्या ईशस्तवनाने झाला. पहिल्या सत्रात ह.भ.प. विष्णू गांवस, ह.भ.प. सर्वेश साळगांवकर, ह.भ.प. नुतन रेवाडकर व ह.भ.प. दत्तगुरू अभ्यंकर यांनी कीर्तने सादर केली. त्यानंतर दुसऱया सत्रात ह.भ.प. डॉ. उर्वी फडके, ह.भ.प. स्वतेजा कुंभार, ह.भ.प. मनस्वी नाईक यांची कीर्तने झाली. अविट गोडीची एकाहून एक सरस पारंपारिक कीर्तनाचे सादरीकरण करीत देवभूमी खांडोळा-माशेल येथील श्रोत्यांना मत्रमुग्ध केले. सायंकाळच्या सत्रात ‘आजच्या काळात कीर्तनाची आवश्यकता’ या विषयावर ह.भ.प. सुहासबुवा वझे, ह.भ.प. विवेकबुवा जोशी, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी परिसंवादात भाग घेतला. परिसंवादाचे अध्यक्षपद डॉ. गोविंद काळे यांनी भूषविले.
प्रितम खांडेपारकर यांनी स्वागत केले. डॉ. उर्वी फडके यांनी स्वागत गीत सादर केले. लक्ष्मण पित्रे यांनी कीर्तन प्रशस्ती श्लोकाचे सादरीकरण केले. प्रास्तविक सागर जावडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यानी तर ऍड. करूणा बाक्रे यांनी आभार मानले. ह.भ.प. संज्योत केतकर (पुणे) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने संमेलनाची सांगता झाली.