ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. आज दुपारी गोऱ्हे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज अशी नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. त्यांनी 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत होत्या. राजकारणापलिकडे जाऊन त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांनी प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांची नाराजी उघड झाली होती. दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना रामराम करत विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळले आहे. गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.