पुणे / वार्ताहर :
भारतीय जनता पक्षाचे आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात 26 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बंदोबस्ताच्या दृष्टीने शिवाजीनगर पोलीस ग्राऊंड याठिकाणी सुरु असलेली भरती प्रक्रीया 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (प्रशासन) रोहिदास पवार यांनी दिली.
पुणे पोलिसांकडून सध्या पोलीस शिपाई आणि चालक पदाकरिता भरती प्रकिया राबवली जात आहे. 720 पोलीस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज पोलिसांकडे आले असून, चालक पदाकरिता सहा हजार 843 जणांचे अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे तीन जानेवारीपासून मोठया प्रमाणात भरती प्रक्रिया राबविणे सुरु झाले. सुरुवातीला दरदिवशी केवळ 500 उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवली जात होती परंतु, नंतरच्या काळात त्यात वाढ करुन दरदिवशी दोन हजार उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरु झाली. पुणे शहरातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पुणे शहर घटकातील पोलीस भरती प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चालक पदासाठी 870 नावांची निवडसूची
पोलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रियासाठी तीन ते 17 जानेवारी दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रीया पार पाडण्यात आली. या मैदानी चाचणीत 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात सामाजिक / समांतर प्रवर्ग / आरक्षणनिहाय वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या एकूण 870 उमेदवारांची तात्पुरती निवडसूची पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. चालक पोलीस शिपाई पदाचे उमेदवारांनी तात्पुरती निवडसूची पाहून सामाजिक/ समांतर प्रवर्ग आरक्षण व गुणांबाबत काही तक्रार, आक्षेप असल्यास 19 फेब्रुवारी पर्यंत पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे येथे ईमेलवर लेखी अर्जाद्वारे सांगावे, अशी माहिती पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे.