संसदेत लवकरच सादर होणार नवे विधेयक
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बँकिंग अन् सायबर फ्रॉड (फसवणूक) रोखण्यासाठी केंद्र सरकार मोठी तयारी करत आहे. लवकरच याकरता कायद्यात बदल करत कठोर नियम लागू केले जाणार आहेत. माहिती-प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरसंचार विधेयक- 2022 मध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी सामील करत लोकांना फसवणुकीपासून वाचविले जाणार असल्याचे शुक्रवारी म्हटले आहे.
एखाद्याला फ्रॉड कॉल आल्यास कॉलरबद्दल माहिती नसते. परंतु आगामी काळात कॉलरसंबंधी कॉल रिसिव्ह करणाऱयांना आपोआप कळू शकेल अशाप्रकारची तरतूद येत्या काळात असणार आहे. केवायसी म्हणजेच ‘नो युवर कस्टमर’ व्यवस्थेच्या अंतर्गत प्रत्येकाला स्वतःच्या अकौंटची माहिती सेवाप्रदात्याला द्यावी लागते. केवायसीची प्रक्रिया मजबूत केली जात आहे. कुणी सेवाप्रदात्याला चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असेल, असे वैष्णव यांनी नमूद पेले आहे.
देशाच्या अनेक भागांमधून सायबर अन् बँकिंग फ्रॉडच्या घटना नोंदविल्या जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार गंभीर आहे. या नव्या विधेयकात असणाऱया तरतुदींमुळे बँकिंग फ्रॉड आणि सायबर क्राइम रोखण्यास मदत मिळणार आहे. फ्रॉड पकडण्यात आल्यावर आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद नव्या विधेयकात समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
सोशल मीडियावरही नजर
फेसबुक, व्हॉट्सऍप आणि टेलिग्राम यासारख्या ऍप्ससंबंधी दूरसंचार विधेयकात तरतूद असणार आहे. याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म देखील नियामकाच्या अधीन असतील. या प्रकरणी सध्या विचारविनिमय सुरू आहे. भारतीय दूरसंचार मसुदा विधेयक-2022 हे वर्तमान इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1885, वायरलेस टेलिग्राफ ऍक्ट आणि टेलिग्राफ वायर्स ऍक्टची जागा घेणार आहे. सध्या या विधेयकाकरता लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. नजिकच्या काळात हे नवे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
व्हॉट्सऍप कॉलसाठी द्यावे लागणार पैसे?
व्हॉट्सऍपद्वारे जर तुम्ही लोकांशी बोलत असाल किंवा मेसेज पाठवत असाल तर तुम्हाला ही सेवा मोफत मिळणार नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या दूरसंचार विधेयकात व्हॉट्सऍप आणि फेसबुकद्वारे कॉल आणि मेसेज पाठविण्याच्या प्रकाराला दूरसंचार सेवा मानले जाणार असल्याचे म्हटले गेले आहे. याकरता कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. व्हॉट्सऍप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मकडून ग्राहकांना मेसेज अन् कॉल करण्याची सेवा देण्यात येत असल्याने नुकसान होत असल्याची तक्रार देशातील दूरसंचार कंपन्या सातत्याने करत आहेत. याचमुळे व्हॉट्सऍप कॉल करता पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे.