स्वीस-जर्मन प्रसारमाध्यमाचा दावा ः अमेरिकेने रशियाशी साधला संपर्क
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
रशिया आणि युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. एक वर्षानंतरही हे युद्ध संपण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युद्ध संपविण्यासाठी रशियासमोर एक प्रस्ताव ठेवला होता असे वृत्त समोर आले आहे. या प्रस्तावाच्या अंतर्गत बायडेन यांनी युक्रेनचा 20 टक्के हिस्सा रशियाला देण्याचा मुद्दा मांडल्याचा दावा स्वीस-जर्मन प्रसारमाध्यमाने केला आहे.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स हे जानेवारीमध्ये गुप्त दौऱयांतर्गत मॉस्कोत पोहोचले होते. तेथे त्यांनी मांडलेल्या शांतता प्रस्तावामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अत्यंत नाराज झाले होते. व्हाईट हाऊसच्या वतीने बर्न्स हा प्रस्ताव मांडत होते असा दावा संबंधित प्रसारमाध्यमांनी केला आहे. व्हाईट हाऊस आणि विलियम बर्न्स या दोघांनीही हा दावा फेटाळला आहे.
बर्न्स गुप्त यांनी दौऱयांतर्गत युक्रेनमध्ये जात अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. बर्न्स यांनी जानेवारी महिन्यात युद्ध संपविण्यासाठी एक योजना झेलेन्स्की यांच्यासमोर मांडली होती. न्यू जुर्चर जीटुंगने उच्चस्तरीय जर्मन मुत्सद्यांच्या दाखल्याने हा दावा केला आहे. युक्रेन आणि रशियाने हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिल्याचे प्रसारमाध्यमाने म्हटले आहे.
युक्रेन, रशियाचा नकार
अमेरिकेच्या वतीने युक्रेनचा 20 टक्के हिस्सा रशियाला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा हिस्सा युक्रेनच्या पूर्व डोनबास क्षेत्राइतका आहे. स्वतःची सीमा रशियासोबत विभागण्यास तयार नसल्याचे म्हणत युक्रेनने हा प्रस्ताव नाकारला होता. तर रशिया कुठल्याही स्थितीत या युद्धात विजय मिळविणारच असे उत्तर रशियाच्या अधिकाऱयांकडून अमेरिकेला देण्यात आले.
व्हाईट हाऊसने फेटाळला दावा
व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन डेवेट यांनी हा वृत्त अहवाल पूर्णपणे योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. युक्रेनमधील युद्ध टाळण्यासाठी बायडेन यांनी शांतता योजनेच्या अंतर्गत रशियासमोर प्रस्ताव मांडला होता, परंतु रशिया आणि युक्रेन दोघांनीही हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिल्याने बायडेन यांनी युक्रेनला अब्राम रणगाडे पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे जर्मन नेत्यांकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रसारमाध्यमाने केला आहे.
युद्धावरून अधिकाऱयांमध्ये मतभिन्नता
युक्रेनला 31 एम1 अब्राम रणगाडे दिले जाणार असल्याचे घोषणा अमेरिकेने 25 जानेवारीला केली होती. परंतु हे रणगाडे पोहोचण्यास महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे युद्ध कशाप्रकारे संपुष्टात आणावे यावरून अमेरिकेच्या अधिकाऱयांमध्ये मतभिन्नता आहे. बर्न्स आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुविलियान हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात आणत चीनवर लक्ष केंद्रीत करू पाहत आहेत. तर विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन कुठल्याही स्थितीत रशियाला युद्धात विजय मिळविण्यापासून रोखू पाहत आहेत.