खेड प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाडनजीक सोमवारी रात्रीच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. मुंबईहून दापोलीला जाणाऱ्या वॅगनार कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत कार जळून खाक झाली.
मसूर अहमद अब्दुल जफार सिद्दिकी (43, रा. नवी मुंबई) हे एम.एच. 03/सी.पी. 7898 कमांकाची वॅगनार कार घेवून मुंबई येथून दापोली येथे जात होती. कोलाडनजीक धरणवाडी येथे आल्यावर समोरच्या बाजूस इंजिनमधून अचानक धूर येवू लागल्याने कार रस्त्याच्या एका बाजूस उभी केली. कारने क्षणातच पेट घेतल्याने जळून खाक झाली. या बाबतचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणा व मदतकर्ते घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत कार आगीत भस्मसात झाली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. या बाबत माणगाव पोलीस स्थानकात खबर दिली. माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दोडकुलकर अधिक तपास करत आहेत.