प्रतिनिधी,कोल्हापूर
राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान झाल्याच्या संशयावरून सोमवारी छापा टाकण्यात आला होता. महापालिकेच्या वैद्यकीय अधिक्रायांनी मंगळवारी छाप्यातील कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली. यानंतर प्रत्यक्षात जबाब नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. संबंधित महिलेचा अहवालही आज (दि.14) प्राप्त होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी बेकायदेशीर गर्भलिंग निदान झाल्याच्या संशयावरून डॉ.सोनल वालावलकर यांच्या श्री हॉस्पीटलमध्ये छापा टाकला. यावेळी हॉस्पीटलमधील सोनोग्राफी मशिन सील करुन तपासासाठी रजिस्टर आणि साहित्य महापालिकेच्या पथकाने ताब्यात घेतले. मंगळवारी दिवसभर कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली. मात्र हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि अन्य लोकांचे जबाब नोंदविता आले नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान छाप्यावेळी हॉस्पीटलमधील एका महिलेला अतिरक्तस्त्राव होत असल्याने तिला सीपीआर मध्ये दाखल केले आहे. त्या महिलेला कोणता त्रास होता आणि काय उपचार केले गेले आहेत, याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत अहवाल मिळाला नसल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातील अधिकारी डॉ.रती अभिवंत यांनी दिली. यामुळे पुढील प्रक्रिया आज (दि. 14) राबवण्यात येणार आहे.