थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमधील एका मुस्लीम दांपत्याने 20 वर्षांच्या नंतर पुन्हा विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत लग्न केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या दांपत्याला दोन कन्या आहेत. या कन्यांना आपल्या मालमत्तेवर वारसा अधिकार मिळावेत यासाठी या जोडप्याने अशा प्रकारे पुन्हा विवाह केल्याचे समोर आले आहे.
डॉ. शीना आणि अभिनेता सी. शकूर यांचा विवाह 29 वर्षांपूर्वी इस्लामी पद्धतीनुसार झाला होता. त्यांना दोन कन्यांची प्राप्ती झाली. हा विवाह शरियत कायद्यानुसार झाल्याने त्यांच्यावर संपत्तीच्या वारसा अधिकारचे शरियतचे नियम लागू होणार होते. या नियमांच्या अनुसार मुस्लीम दांपत्याला पुत्र नसेल आणि केवळ 2 कन्या असतील तर कन्यांना पित्याच्या मालमत्तेतील केवळ दोन तृतियांश वाटा मिळतो. उरलेला एक तृतियांश वाटा शकूर यांच्या भावाला मिळणार होता. मात्र, संपूर्ण मालमत्ता आपल्या कन्यांनाच मिळावी अशी या दांपत्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी शरियत कायद्यातील अट टाळण्यासाठी विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत आणखी एकदा विवाह केल्याचे स्पष्ट होत आहे. केरळमधील मुस्लीम समाजात या विवाहामुळे खळबळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे.