बेळगाव : 1986 मधील कन्नडसक्ती विरोधी आंदोलनाचा बेळगावातील हा किस्सा. सीमाभागासह संपूर्ण देशातील सर्वपक्षीय नेत्यांचे त्याकडे लक्ष वेधले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते साथी एस. एम. जोशी आणि शरद पवार यांचेकडे या लढ्याचे नेतृत्त्व होते. विशेष म्हणजे साथी एस. एम. जोशी तत्कालीन जनता पक्षाचे एक मान्यवर नेते. त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेही जनता पक्षाचे. कर्नाटकात याच पक्षाचे सरकार. आणखी एक वैशिष्ट्या सांगता येईल ते म्हणजे जनता पक्षाचे सरकार असलेले कर्नाटक हे देशातील एकमेव राज्य होते. तोच धागा पकडून भारतीय जनता पक्षाचे क्रमांक दोनचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एस. एम. जोशींना याच मुद्यावर सवाल उपस्थित केला. तुमच्या पक्षाचे राज्य सत्तेवर असताना तुम्ही त्याच पक्षाविरुद्ध आंदोलन कसे करीत आहात? या प्रश्नावर रोखठोक उत्तर देताना एस. एम. जोशी म्हणाले, कोठेही अन्याय होणार असेल तर त्याविरुद्ध लढा देण्याची माझी स्पष्ट भूमिका आहे आणि हे आंदोलन अन्यायाविरुद्ध संघर्षाचे आहे. भले हेगडे आमच्या पक्षाचे नेते असतीलही मात्र त्यांच्याकडून अन्याय होत असताना मी कसा स्वस्थ बसू! अन्यायग्रस्तांना मी न्याय मिळवून देणारच. येथे हा मुद्दा उपस्थित झाला तो सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. सीमाभागातील मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांकडून महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांना प्रचारसभांमध्ये उतरवलेले आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्याचे पडसाद बेळगावबरोबरच खानापूर तालुक्यातही उमटले. म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या बड्या नेत्यांनी पक्षादेश मानणे हे कर्तव्यच आहे. त्यानुसार आपण गेलो. मात्र आम्ही म. ए. समिती विरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. पण ती तर सारवासारवच. साथी एस. एम. जोशींचा हा आदर्श यावेळी लक्षात येतो आणि या नेत्यांनी केविलवाणी सारवासारव किती हा फरक! म. ए. समितीमधील तरुणांना हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी नव्हे का?
Previous Articleटिळकवाडीतून कोंडुस्कर यांना भरघोस पाठिंबा
Next Article राहुल गांधी आज भुतरामहट्टीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.