अमेरिकेच्या रहिवासी मिसेला शोर यांचा श्वान 21 वर्षांचा झाला आहे. तो सांप्रतच्या काळातील जगातील सर्वात जास्त आयुष्य लाभलेला श्वान म्हणून ओळखला जात आहे. 21 वर्षांपूर्वी त्याला मिसेला शोर यांनी ‘दत्तक’ घेतले होते. आज या श्वानाने पृथ्वीवरील ‘ओल्डेस्ट डॉगी’ बनण्याचा विक्रम केला आहे.
त्याचे हे दीर्घायुष्य गिनिज बुकमध्येही नोंद करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे त्याच्या प्रजातीचे कुत्रे दहा ते तेरा वर्षे जगतात. मात्र, हा टोबिकिथ प्रजातीचा श्वान तब्बल 21 वर्षे 66 दिवसांचा झाला आहे. आजही त्याची प्रकृती ठणठणीत असून तो कार्यरत आहे. मिसेला त्याच्यावर पुत्रवत प्रेम करतात. भात आणि उकडलेल्या भाज्या हा त्याचा प्रमुख आहार असून तो कुंभकर्णी झोपेसाठी प्रसिद्ध आहे. वास्तविक श्वान अत्यंत जागरुक असतात. थोडीशी चाहूल लागली तरी त्यांचे भुंकणे सुरू होते. पण वयपरत्वे म्हणा किंवा लाडामुळे म्हणा हा श्वान मात्र गृहरक्षण करण्यापेक्षा स्वतःचे लाड करून घेण्यातच अधिक मग्न आहे.
टोबिकिथ ही कुत्र्यांची प्रजाती लहान आकाराची असते. ही प्रजाती प्रामुख्याने मेक्सिकोमध्ये सापडते. ही प्रजाती चिहुआहुआ या नावानेही ओळखली जाते. त्यांची समज इतर कुत्र्यांच्या मानाने अतिशय अधिक असते. वजन मात्र केवळ 2.4 किलो ते 4.1 किलो इतकेच असते. या प्रजातीला जगभरात मोठी मागणी आहे.