ग्रा. पं. सदस्य-कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार : आधार लिंक त्वरित करून कामे देण्याची मागणी
वार्ताहर /कडोली
आधार लिंक नसल्याचे कारण देत गेले दोन-तीन महिने झाले कामापासून वंचित ठेवण्यात आलेल्या अनेक संतप्त रोजगार कामगारांनी सोमवारी कडोली ग्रामपंचायतीला धडक देऊन ग्रा. पं. सदस्य आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करुन त्वरीत आधार लिंक करुन कामे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या एनपीसीआय नवीन नियमानुसार खात्री योजनेतील कामगारांचे आधार लिंक करुन घेणे आवश्यक आहे. काही रोजगारांच्या नावात सौम्य प्रमाणात चूक असली तरी रोजगार कामगाराचे नाव एमएमआर लिस्ट आले नाही अशी अनेक संघात पाच ते सहा नावे आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अगोदर हे कामगार कोणतीही अडचण नसताना कामावर नियमित काम करत होते. अशाना नवीन नियमानुसार चुका दाखवून वगळण्यात आले आहे. गेले दोन-तीन महिने झाले असे अनेक कामगार कामापासून वंचित राहिले आहेत. मार्च 2023 जवळ आला तरी हा गुंता सुटत नसल्याने संतप्त रोजगार कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन ग्रा. पं. सदस्य व कर्मचाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित करुन नकोसे करुन सोडले. कडोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कडोली, जाफरवाडी, देवगिरी आणि गुंजेनहट्टी गावातील सुमारे 800 रोजगार कामगारांना आधार लिंकचे कारण देत वगळण्यात आल्याने कामगारांवर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा आधार लिंकचा गुंता लवकरात लवकर सोडवून काम चुकलेल्या कामगारांना त्वरीत कामे द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. यासाठी ग्राकुस संघटनेचे विश्वेश्वरया हिरेमठ यांनी पुढाकार घेतला.