ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस : कॅस्पर रुड, रॉजर्स, कुडरमेटोव्हा पराभूत, व्हॉलीनेट्स, सित्सिपस, फेलिक्स, टायफो यांचीही आगेकूच
वृत्तसंस्था /मेलबर्न
आर्यना साबालेन्का, जेन्सन ब्रूक्सबी, नोव्हॅक जोकोविच, केटी व्हॉलीनेट्स, डॅनील मेदवेदेव्ह, स्टेफानोस सित्सिपस, फेलिक्स ऍलियासिमे, फ्रान्सिस्को टायफो यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची तिसरी फेरी गाठली. द्वितीय मानांकित नॉर्वेचा कॅस्पर रुड, शेल्बी रॉजर्स, नववी मानांकित व्हेरोनिका कुडरमेटोव्हा यांचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले.
पाचव्या मानांकित साबालेन्काने आपला सुपर फॉर्म कायम राखत शेल्बी रॉजर्सचा 6-3, 6-1 असा पराभव केला. याआधीही मागील वर्षी या दोघींची दोनदा गाठ पडली होती आणि दोन्ही वेळेस साबालेन्काने विजय मिळविले होते. तिची पुढील लढत तिची दुहेरीची नियमित जोडीदार 26 व्या मानांकित एलिस मर्टेन्सविरुद्ध होईल. बेल्जियमच्या मर्टेन्सने अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसवर 6-4, 6-3 अशी मात केली. सव्वा तास ही लढत रंगली होती. पात्रता फेरीतून आलेल्या अमेरिकेच्या केटी व्हॉलीनेट्सने धक्कादायक निकाल देताना नवव्या मानांकित व्हेरोनिका कुडरमेटोव्हाला 6-4, 2-6, 6-2 असा धक्का देत तिसरी फेरी गाठली. 19 व्या मानांकित एकतेरिना ऍलेक्झांड्रोव्हाने टेलर टाऊनसेंडचा 1-6, 6-2, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली.
पुरुष एकेरीत मॅकडोनाल्डने मंगळवारी नदालचा पराभव करून धक्कादायक निकाल दिला होता. दुसऱया दिवशी अमेरिकेच्या 22 वर्षीय जेन्सन ब्रूक्सबीने दुसऱया मानांकित कॅस्पर रुडचे आव्हान 6-3, 7-5, 6-7 (4-7) 6-2 अशी मात करीत कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळविला. त्याची ही पदार्पणाची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. सुमारे चार तास ही लढत चालली होती. रुड हा प्रेंच ओपन व यूएस ओपनचा मागील वर्षीचा उपविजेता आहे. त्याचेच देशवासी बेन शेल्टन, टॉमी पॉल, जेजे वुल्फ, फ्रान्सिस टायफो, सेबॅस्टियन कोर्दा यांनीही तिसऱया फेरीत स्थान मिळविले. शेल्टनने पात्रता फेरीतून आलेल्या चिलीच्या निकोलास जॅरीचा 7-6 (7-3), 7-6 (7-3), 7-5, टॉमी पॉलने स्पेनच्या डेव्हिडोविच फोकिनाचा 6-2, 2-6, 6-7 (4-7), 6-3, 6-4, वुल्फने 23 व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनचा 6-1, 6-4, 6-4 असा पराभव केला.
सर्बियाच्या जोकोविचनेही तिसरी फेरी गाठली असून त्याने धोंडशिरेच्या समस्येवर मात करीत पात्रता फेरीतून आलेल्या एन्झो कौकॉडचा चार सेट्सच्या झुंजीत 6-1, 6-7 (5-7), 6-2, 6-0 असा पराभव केला. या स्पर्धेतील त्याचा हा सलग 23 वा विजय आहे. त्याने याआधी 9 वेळा ही स्पर्धा जिंकली असून दहाव्यांदा त्याला जेतेपदाची संधी मिळाली आहे. नदाल, कॅस्पर रुड, टेलर फ्रिट्झ हे अव्वल प्रतिस्पर्धी स्पर्धेबाहेर पडले असल्याने त्याला ही संधी मिळणार आहे. त्याची पुढील लढत बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हशी होईल. डिमिट्रोव्हने सर्बियाच्या लॅजलो डेअरचा 6-3, 6-2, 6-0 असा धुव्वा उडवित आगेकूच केली.
पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने ऍलेक्स मॉल्कनवर पिछाडीवर पडल्यानंतर संघर्षपूर्ण विजय मिळविला. सहाव्या मानांकित ऍलियासिमेने मॉल्कनवर 3-6, 3-6, 6-3, 6-2, 6-2 अशी मात केली. अमेरिकेच्या 16 व्या मानांकित टायफोने तिसरी फेरी गाठताना चीनच्या 17 वर्षीय शांग जुनचेंगचा 6-4, 6-4, 6-1 असा धुव्वा उडवला. जुनचेंग पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. कुबलर किंवा खचानोव्ह यापैकी एकाशी टायफोची पुढील लढत होईल.
ग्रीसच्या सित्सिपसने ऑस्ट्रेलियाचा वाईल्डकार्ड प्रवेशधारक रिन्की हिजिकाताचा 6-3, 6-0, 6-2 असा फडशा पाडला. सित्सिपसने या स्पर्धेत तीनवेळा उपांत्य फेरी गाठलेली आहे. त्याची लढत ग्रीक्सपूर किंवा झांडस्कल यापैकी एकाशी होईल. रशियाच्या मेदवेदेव्हने स्थानिक खेळाडू जॉन मिलमनचा 7-5, 6-2, 6-2 असास पराभव करून सलग पाचव्यांदा तिसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याने 2021 व 2022 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिसऱयांदा अंतिम फेरी गाठणारा चौथा खेळाडू होण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण यावेळी तो जेतेपदासाठी जास्त प्रयत्न करेल. त्याची पुढील लढत सेबॅस्टियन कोर्दाशी होईल. कोर्दाने जपानच्या पात्रता फेरीतून आलेल्या योसुके वातानुकीवर 6-2, 7-5, 6-4 अशी मात केली.
महिला दुहेरीत सानिया मिर्झा-ऍना डॅनिलिना दुसऱया फेरीत
शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळणाऱया भारताच्या सानिया मिर्झाने कझाखस्तानची जोडीदार ऍना डॅनिलिनासमवेत महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली. सानिया-ऍना यांनी हंगेरीची दालमा गल्फी व अमेरिकेची बर्नार्डा पेरा यांच्यावर 6-2, 7-5 अशी मात केली. सव्वा तास ही लढत रंगली होती. पहिला सेट त्यांनी 25 मिनिटांत संपवल्यानंतर दुसऱया सेटमध्ये त्यांनी 4-1 अशी आघाडी घेतली होती. पण गल्फी-पेरा यांनी नंतरचे चार गेम्स जिंकल्यानंतर 5-5 अशी बरोबरी साधली. पण नंतर ऍनाने आपल्या सर्व्हिसवर सेटसह सामना संपवला. दुसऱया फेरीत त्यांची लढत ऍलिसन व्हान उत्वांक व ऍनहेलिना कॅलिनिना यांच्याशी होणार आहे. फेबुवारीत होणाऱया दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्त होणार असल्याचे सानियाने याआधीच जाहीर केले आहे.