‘राधा ही बावरी’ खास आकर्षण
प्रतिनिधी /मडगाव
साईनगर-घोगळ, फातोर्डा-मडगाव येथील साई मंदिरात आज चैत्र कृष्ण पंचमी गुरूवार दि. 21 रोजी सकाळी 11.32 वाजता साईबाबांच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त आज मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी होतील. त्यात आवाहित देवता पूजन प्राणप्रतिष्ठा तत्वन्यास, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य आरती, सार्वजनिक प्रार्थना, आशीर्वाद. दुपारी 1 वाजता ‘महाप्रसाद’ होईल.
सायंकाळी 7.30 वा.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तरुणाईचे आवडते गायक स्वप्नील बांदोडकर यांचा ‘राधा ही बावरी’ या मराठी सांगीतीक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात त्यांच्या सोबत मुंबई येथील सुप्रसिद्ध गायिका कविता राम व प्रख्यात आवाजावर कलाकार मेघना एरंडे या निवेदीका म्हणुन लाभणार आहेत. तसेच गोव्याची प्रतीथयश गायिका अक्षदा तळावलीकर व गायक समृद्ध चोडणकर यांचा समावेश असणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन तबलापटु व संगीतकार यतीन तळावलीकर यांनी केलं असून वाद्दवृंद संयोजक विष्णु शिरोडकर सोबत दीपक मणेरीकर, प्रकाश आमोणकर, यतीन तळावलीकर, मिलींद साखरदांडे व इतर सर्व कलाकार साथसंगत करणार आहेत.
श्री सद्गुरू साईनाथ मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळय़ाला सोमवार दि. 18 रोजी प्रारंभ झाला होता. या दिवशी सकाळी यजमान प्रायश्चित, महासंकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वरण, मंडप प्रतिष्ठा, गंगा पूजन, जालधिवास व शांती होम झाला. मंगळवार दि. 19 रोजी स्थान विधा – ब्रम्हादि देवता स्थापना, वास्तुहोम, गृहहोम, देवता प्रार्थना. काल बुधवार दि. 20 रोजी आवाहित देवता पूजन, पर्याय होम पिंडिका अधिवास देवता प्रार्थना, नैवेद्य व आरती इत्यादी कार्यक्रम झाले.
आज होत असलेल्या श्री सद्गुरू साईनाथमूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळय़ाला व महाप्रसादाला तसेच सायंकाळी होणाऱया ‘राधा ही बावरी’ कार्यक्रमाला भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई सेवा समितीने केले आहे.