राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून गोवा मुक्तीदननिमित्त शुभेच्छा
प्रतिनिधी /पणजी
गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटच्या माध्यमातून गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या असून जनतेचे अभिनंदन केले आहे. तशा आशयाचा संदेशही त्यांनी गोव्यासाठी पाठवला आहे.
गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांचे बलिदान केले त्या सर्वांप्रति भावपूर्ण आदरांजली. त्यावेळी केलेल्या विशेष कामगिरीबाबत संरक्षण दलांनाही अभिवादन आहे. ज्यांनी गोवा मुक्तीसाठी प्राण वेचले त्या सर्वांना माझा सलाम आहे, अशा शब्दात मुर्मू यांनी गोव्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गोवा मुक्तीच्या चळवळीत अनेकांनी प्राणत्याग केला. बलिदान दिले त्यांची आठवण आज होते. त्या सर्वांच्या स्मृती आज पुन्हा जाग्या होत आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामुळे आम्हाला मोठे प्रोत्साहन मिळाले असून त्याच्या जोरावरच गोवा राज्याची प्रगतीची वाटचाल जोमाने सुरु आहे. गोवा मुक्तीचा लढा कदापि विसरता येणे शक्य नाही. मुक्तीदिनाचा योग साधून आपण सर्व गोमंतकीय जनतेला शुभेच्छा देतो व जनतेचे अभिनंदन करतो, असे मोदी यांनी आपल्या संदेशातून म्हटले आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी व अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.