उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांची माहिती
भोगावती / प्रतिनिधी
शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्री तक्रारीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा पोलीस प्रमुख, प्रादेशिक साखर सहसंचालक व भोगावतीला दिलेल्या निवेदनातील मागणीनुसार आम्ही स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करणार आहोत. तसेच चौकशीतून जे दोशी ठरतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई करु असे ठोस आश्वासन भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर व संचालक मंडळाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
पाटील पुढे म्हणाले की, साखर परस्पर विक्री करण्याचा स्वाभिमानी संघटनेकडून वारंवार आरोप होत आहे. त्यामुळे कारखान्याची विनाकारण बदनामी होत आहे. आजपर्यतच्या आरोपामध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन त्यांच्या या उठाठेवी चालू आहेत. मात्र निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांचे वाभाडे जरूर काढु. त्यासाठी विनाकारण भोगावतीची बदनामी करु नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कारखान्याची साखर विक्री रितसर टेंडर काढून कायदेशीर मार्गाने होत असून आताही चालू आहे.मात्र कारखान्यातून बाहेर पडलेला साखरेचा ट्रक कोठे जातो ? याची चौकशी आम्ही कशाला करावी ? यासाठी पोलीस खाते योग्य तो तपास करीलच. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील- पिरळकर, ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर, ए.डी. पाटील, हिंदुराव चौगले, प्रा ए. डी. चौगले, संजयसिंह पाटील, शिवाजी कारंडे, प्रा. सुनील खराडे, डी.आय. पाटील, मारुती जाधव, धिरज डोंगळे, रविंद्र पाटील, पांडुरंग पाटील, बी. आर. पाटील, प्रा. एस. ए. पाटील, जयवंत कांबळे, मोहन डवरी, बी. ए. पाटील, बळीराम पाटील यांचेसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.