देवीच्या दर्शनाची संधी मिळाली हे भाग्यच-भोसले, सप्तकोटिश्वर मंदिराच्या लोकार्पणाबद्दल आनंद, संस्थान समितीकडून सत्कार
कुंकळ्ळी : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाळ्ळी येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण संस्थानला भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सातारा, येथील जिल्हा परिषद सदस्य राजूभैय्या भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष फिरोझ पठाण व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता उपस्थित होते.
वरील मान्यवरांचे बाळ्ळीत आगमन होताच संस्थानचे अध्यक्ष नीलेश फळदेसाई, सचिव श्रीजित फळदेसाई, खजिनदार नितीन फळदेसाई, मुखत्यार समीर फळदेसाई यांनी त्यांचे स्वागत केले, तर प्रवेशद्वारावर सुहासिनी शोभना फळदेसाई, अमित फळदेसाई, संपदा फळदेसाई, स्नेहा फळदेसाई, मीरा फळदेसाई यांनी ओवाळणी केली. बँडवादनाच्या तालावर आमदार भोसले यांना मंदिरात आणले गेले. त्यांनी नंतर देवीला ओटी अर्पण करून आशीर्वाद घेतला. पुरोहित मनोज बर्वे, पुजारी निरंजन यांनी देवीला सांगणे घातले व त्यांना तीर्थप्रसाद दिला. याप्रसंगी संस्थानचे माजी अध्यक्ष संदीप फळदेसाई, सत्येंद्र फळदेसाई, उद्योजक सम्राट फळदेसाई, बाळ्ळीचे सरपंच उपेंद्र (गोविंद) फळदेसाई, फातर्पा सरपंच महेश फळदेसाई व इतर उपस्थित होते.
प्रदक्षिणा घातल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अध्यक्ष नीलेश फळदेसाई यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांचा त्यांनी सत्कार केला. जिल्हा परिषद सदस्य राजूभैय्या भोसले यांचा समीर फळदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा नितीन फळदेसाई व फिरोझ पठाण यांचा शिवानंद फळदेसाई यांनी सत्कार केला. नंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे श्र्रद्धेने व वंदनीय व्यक्तिमत्त्व म्हणून कायम पाहिले जाते. आजही त्यांची थोरवी गायिली जात आहे. आपण या घराण्याचे साताऱ्याचे 13 वे वंशज आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
देवीच्या दर्शनाची संधी मिळाली हे भाग्यच
जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटिश्वर मंदिराच्या लोकार्पणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. खरे म्हणजे त्याकरिता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलावले. त्यानिमित्ताने तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यामुळे श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. आपले तसे गोव्याला येणे होतेच, असे आमदार भोसले म्हणाले. आमच्या घराण्याला महाराष्ट्रात व उर्वरित देशभरात प्रेम लाभत आहे ते शिवाजी महाराजांवरील श्रद्धेपोटी तसेच त्यांनी जे काही जनतेसाठी केले आणि परकीयांच्या विरोधात जो लढा दिला त्यामुळे आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री सप्तकोटिश्वर मंदिराच्या लोकार्पणाचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, त्यावेळेला शिवछत्रपती डिचोलीला आले असताना त्यांनी श्री सप्तकोटिश्वर मंदिराचा पोर्तुगीजांकडून विध्वंस पाहिला व 16 व्या शतकामध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून पोर्तुगीजांना थोडा फार अटकाव झाला. येथे येणे झाले हे आपण आपले भाग्य समजतो. श्री शांतादुर्गा असो किंवा तुळजा भवानी असो, शेवटी सगळी एकाच देवीची रूपे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी देवी वेगवेगळ्या रूपाने प्रकट झाली आणि त्या त्या नावाने देवीला ओळखण्यात येते. देवीकडे आपण एवढीच प्रार्थना करतो की, सगळ्यांना सुख व वाटचालीत भरभरून यश मिळावे, असे आमदार भोसले यांनी पुढे सांगितले.
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, जेव्हा शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांच्या कारवायांविषयी कळले तेव्हा त्यांना अटकाव करण्यासाठी त्यांची पावले गोव्याकडे वळली. येथे श्री सप्तकोटिश्वराचे उद्धवस्त मंदिर पाहिले व त्याचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प पूर्ण केला. या कृतीतून त्यांनी पोर्तुगीजांना यापुढे हिंदूंच्या मंदिराना धक्का पोहोचवाल, तर खबरदार असा अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यामुळे दक्षिण गोव्यातील मंदिरेही सुरक्षित राहीली. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष असून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे त्यांनी सांगितले. जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटिश्वर मंदिराच्या लोकार्पणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
बेतूल किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा : डिकॉस्ता
आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी यावेळी बेतूल किल्ल्याच्या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. पुरातत्त्व खात्याने किल्ल्याचा विकास करावा, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदरपूर्वक स्मरण करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्याला आमंत्रित केले. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटण्याची संधी मिळाली असे सांगून डिकॉस्ता यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला.