ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात मागील 5 महिन्यांपासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होतं. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 25, 2023
साक्षी मलिकने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 7 जूनला आम्हा आंदोलक कुस्तीपटूंची सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत 15 जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरू राहिल. कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. कुस्तीसंघाची 11 जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू, असेही साक्षीने ट्विटमध्ये म्हटले आहे.