वृत्तसंस्था /मँचेस्टर
येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने शेवटची बातमी हाती आली, त्यावेळी 35 षटकात 7 बाद 99 धावा जमविल्या होत्या. या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने केवळ तीन दिवसात डावाच्या फरकाने जिंकून आघाडी घेतली होती.
या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. उपाहारापर्यंत त्यांनी 25 षटकात 5 बाद 77 धावा जमविल्या होत्या. डावातील पाचव्या षटकात इंग्लंडच्या अँडरसनने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का देताना सलामीच्या इर्वेला 3 धावांवर झेलबाद केले. स्टुअर्ट ब्रॉडने कर्णधार एल्गारला 12 धावांवर बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. स्टुअर्ट ब्रॉडने किगेन पीटरसनला रुटकरवी झेलबाद केले. पीटरसनने 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. बेन स्टोक्सने मार्करेमचा बळी मिळविला. त्याने 14 धावा केल्या. व्हॅन डेर डय़ुसेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर उपाहारापूर्वीच पायचीत झाला. त्याने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या.
उपाहारानंतर खेळाच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाला आणि 10 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आणखी दोन फलंदाज तंबूत परतले. अँडरसनने दक्षिण आफ्रिकेच्या आर्मेरला 2 धावांवर पायचीत केले. त्यानंतर अँडरसनने आपल्या याच षटकातील चौथ्या चेंडूवर केशव महाराजला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज बाद झाले. इंग्लंडतर्फे अँडरसन, ब्रॉड आणि स्टोक्स हे प्रभावी गोलंदाज ठरले. अँडरसनने 24 धावात 3, ब्रॉडने 17 धावात 2 तर स्टोक्सने 6 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प. डाव- 35 षटकात 7 बाद 99 (एल्गार 12, इर्वे 3, पीटरसन 21, मार्करेम 14, व्हॅन डेर डय़ुसेन 16, आर्मेर 2, केशव महाराज 0, व्हेरेनी खेळत आहे 18, रबाडा खेळत आहे 4, अँडरसन 3-24, ब्रॉड 2-17, स्टोक्स 2-6),
(धावफलक अपूर्ण)