झुरिच-स्वित्झर्लंड / वृत्तसंस्था
‘फिफा’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनने कतारमधील आगामी फुटबॉल वर्ल्डकपसाठी 24.5 लाख तिकिटांची विक्री झाली असल्याचे जाहीर केले. मिडल ईस्ट अँड अरब वर्ल्डमधील या पहिल्यावहिल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाला आता 100 दिवसांपेक्षाही कमी कालावधी बाकी राहिला आहे. यंदाची फिफा विश्वचषक स्पर्धा दि. 20 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे.
कतार, अमेरिका, युनायटेड किंगडम, सौदी अरेबिया, मेक्सिको, संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स, अर्जेन्टिना, ब्राझील व जर्मनी या देशातील चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात तिकिटे खरेदी केली आहेत. दि. 5 जुलै ते 16 ऑगस्ट या कालावधीत 5 लाख 20 हजार 532 तिकिटांची विक्री झाली असल्याचे फिफाने यापूर्वी जाहीर केले होते. कॅमेरुन-ब्राझील, ब्राझील-सर्बिया, पोर्तुगाल-उरुग्वे, कोस्टारिका-जर्मनी, ऑस्ट्रेलिया-डेन्मार्क या साखळी फेरीतील सामन्यांकडे चाहत्यांचा अधिक कल राहिला आहे.
कतार फिफा वर्ल्डकपसाठी तिकीटविक्रीचा पुढील टप्पा सप्टेंबरच्या उत्तरार्धात होण्याची शक्यता आहे. यंदाचा वर्ल्डकप जेता कोण असेल, याचा फैसला दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे.