वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतच्या पराभवामुळे सिंगापूर ओपन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत श्रीकांतला चिनी तैपेईच्या चिया हाओ ली याने 21-15, 21-19 असे हरविले. याआधी प्रियांशू राजावत व दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांचाही पराभव झाला. राजावतचा जपानच्या तिसऱ्या मानांकित कोदाय नाराओकाने 21-17, 21-16 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत अर्जुन व ध्रुव कपिला यांना इंग्लंडच्या बेन लेन व सीन व्हेन्डी यांच्याकडून 15-21, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
पहिला गेम गमविल्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये ली याला नेटजवळ उत्तम खेळ करीत जेरीस आणले आणि त्याने 9-8 वरून 14-12 व नंतर 19-12 अशी बढत घेतली. यानंतर मात्र श्रीकांतचा जोम हरवला. त्याच्या प्रशिक्षकांनीही त्याला रॅलीजमध्ये न गुंतण्याचा सल्ला दिला. पण त्याने तो जुमानला नाही. श्रीकांतने बेफिकिरपणे शटल लांबवर मारत 9 पैकी पहिला गुण गमविला. व्हिक्टर अॅक्सेलसेनने माघार घेतल्यामुळे संधी मिळालेल्या ली ने सरळ स्मॅश करीत 14-19 अशी श्रीकांतची आघाडी कमी केली. ली ने नंतर 19-19 वर श्रीकांतला गाठले आणि दोन गुण घेत गेमसह सामना जिंकला. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन याआधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत.