जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सारेच आतुरलेले असतात. अनेकजण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी विविध भागातील पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सूचना केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घ्या, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
हिडकल जलाशय, मार्कंडेय जलाशय, नवतीर्थ जलाशय या ठिकाणी सायंकाळी 5 नंतरच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोकाक, गोडचिनमल्की फॉल्स, खानापूर तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणीही बंदोबस्त ठेवण्याची सूचना केली आहे. जिल्ह्यातील घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नदीकाठ परिसरातदेखील सतर्क राहण्याची सूचना त्यांनी केली. सर्वत्र पहाटेपर्यंत गस्त घाला, असे त्यांनी सांगितले.
अतिउत्साही तरुण धिंगाणा घालण्याबरोबरच अशा पर्यटनस्थळी धुडगूस घालण्याची शक्यता आहे. बऱ्याचवेळा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कणकुंबी, जांबोटी, रामदुर्ग या परिसरात अधिक पोलीस फौजफाटा तैनात करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. कित्तूर किल्ला, सौंदत्ती येथील तोरगल किल्ला तसेच इतर ठिकाणी असलेल्या किल्ल्यांमध्येही बंदोबस्त तसेच गस्त घालावी, असे त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामतून संपर्क साधून चर्चा केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घ्या, असे सांगितले आहे.