विद्यार्थी मंडळाच्या अधिकारग्रहण कार्यक्रमास टाळाटाळ : प्राचार्यांविरोधात घोषणाबाजी, वातावरण तंग
प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील सेंट झेव्हियर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाची निवड होऊन वर्ष संपत आले तरी महाविद्यालयाने अद्याप मंडळाचा अधिकारग्रहण कार्यक्रम घेतलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी प्रतिनिंधीनी महाविद्यालयाच्या आवारात ठाण मांडून निदर्शने करून प्राचार्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला.
विद्यार्थी मंडळाची निवड झाल्यापासून सरचिटणीस साहिल महाजन यानी प्राचार्यांकडे अधिकारग्रहण सोहळा आयोजित करण्याची सातत्याने पाच वेळा विनंती केली. मात्र प्राचार्यांनी कोणतीही दखल न घेतली नाही. त्यामुळे अखेर अभविपचे प्रतिनिधी व कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी अधिकारग्रहण कार्यक्रम घेण्याची मागणी करत कॉलेज आवारात घोषणा देत धरणे धरली.
महाविद्यालयाचा विद्यार्थी सरचिटणीस साहील महाजन यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उत्तर गोवा विद्यार्थी संयोजक सुदीप नाईक, म्हापसा शहर शाखामंत्री विनय राऊत, पेडणे शहरमंत्री शुभम मलिक, झेवियरचे विद्यार्थी विनय राऊत, अभय सिमेपुऊषकर, सर्वेश सांगोडकर, दीप्ती कांबळी, प्रभा नाईक, आकाश नाईक या विद्यार्थी प्रतिनिधींनी इतर विद्यार्थ्यांशी याबाबत चर्चा केले व प्राचार्य भेट देत नाहीत, शिवाय अधिकारग्रहण कार्यक्रमही आयोजित करण्यास टाळाटाळ करतात, असे सांगितले. यामुळे नाराजी व्यक्त करत अभविपच्या विद्यार्थी प्रतिनधींनी प्राचार्यांविरोधात घोषणा देत आंदोलन केले यामुळे यावेळी बराच वेळ वातावरण तंग बनले.
गेट बंद केल्याने पालक अडकले
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनागमुळे प्राचार्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगून कॉलेजच्या सर्व गेट बंद केल्या. त्यामुळे मुलांना सोडायला आलेले काही पालकही कॉलेज आवारात अडकून पडले. दरम्यान आंदोलन विद्यार्थ्यासोबत इतर विद्यार्थी सहभागी होऊ नये म्हणून प्राध्यापकांनी त्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या.
पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी अयशस्वी
म्हापसा पोलीस स्थानकाना घटनेची खबर मिळताच निरीक्षक परेश नाईक पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता प्राचार्यांना पाचारण करून आमची मागणी मान्य करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. मात्र प्राचार्यांनी ती मागणी धुडकावून लावल्याने काही काळ वातावरण तंग झाले. विद्यार्थ्यांनी अभाविपचे झेंडे दाखवित प्राचार्यांविरोधात घोषणा सुरूच ठेवल्या.
मामलेदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी बार्देशच्या संयुक्त मामलेदार वर्षा परब यांना पाचारण केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांनी आम्हाला प्राचार्यांनी विद्यार्थी मंडळाचा अधिकारग्रहण सोहळा आयोजित करून
आम्हाला न्याय देण्याची मागणी केली. संयुक्त मामलेदार वर्षा परब, निरीक्षक परेश नाईक, उपअधीक्षक जीवबा दळवीही घटनास्थळी दाखल होऊन प्राचार्याची भेट घेऊन चर्चा केली व येत्या मंगळवार दि. 24 रोजी स. बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत विद्यार्थी, प्राचार्य व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मामलेदार परब यांनी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
बाहेरील विद्यार्थ्यांना मज्जाव करावा : शिक्षकांची मागणी
बाहेरील विद्यार्थी कॉलेजच्या आवारात आंदोलन करत असल्याने शिक्षक आक्रमक झाले. बाहेरील विद्यार्थी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना भडकावू शकत नाहीत. त्यांना हाकलून लावा असा आग्रह शिक्षकांनी धरला. त्यावर विद्यार्थी आक्रमक झाले. आमच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी केली. यावेळी पत्रकार व शिक्षकांचीही शाब्दिक चकमक झाली.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष: साहील महाजन
दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका पार पडल्या. आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्या प्राचार्याकडे घेऊन जातो मात्र आमची दखल घेतली जात नाही. वर्ष संपण्यास 3 महिने उरले. विद्यार्थ्यांना काहीच सोयी सुविधा देत नाहीत. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समस्या सुटेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा सरचिटणीस साहिल महाजन यांनी दिला.