प्रतिनिधी / वास्को
राहण्यासाठी मोफत घर देण्याचे आमिष दाखवून त्या बदल्यात लाखो रूपयांची मुदत ठेव स्विकारून वास्कोतील 250 कुटुंबांना कोटय़वधी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या नूर अहम्मद या ठकसेनाला अखेर गोवा सीआयडीने बिहार आणि नेपाळ पोलिसांच्या मदतीने नेपाळच्या सीमेवर जेरबंद करण्यात यश मिळवले. नूर अहम्मद मागच्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याच्या आमिषांना बळी पडलेल्या लोकांनी पोलिसांकडे मदतीची याचना केली होती. गोवा पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या गुन्हय़ाखाली अटक केली आहे.
जवळपास तीन महिन्यांपूर्वी वास्कोत या प्रकरणाने खळबळ उडवून दिली होती. पन्नासहून अधिक मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील महिला, पुरूष, युवक, युवती वास्को पोलीस स्थानकावर एकत्र येऊन त्यांनी वास्कोतील नूर अहम्मद या युवकाने आम्हाला कशा प्रकारे फसवले याची माहिती पोलिसांसमोर आणि प्रसिध्दी माध्यमांसमोर कथन केली होती. काहींनी सविस्तर लेखी तक्रारीही पोलिसांकडे दिल्या होत्या. मात्र, आपल्या कुटुंबासह बेपत्ता झालेल्या नूर अहम्मद याला शोधून काढणे कठीण बनले होते. हे प्रकरण नंतर गुन्हा अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्यात आले होते. पोलिसांनी नूर अहम्मद याची माहिती मिळवून त्याचा शोध जारीच ठेवला होता. अखेर जवळपास तीन महिन्यांनी हा ठकसेन पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांच्या या कामगीरीमुळे नूर अहम्मदकडून लाखो रूपयांना फसल्या गेलेल्या कुटुंबांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. आपली कष्टांची कमाई परत मिळावी या प्रतिक्षेत हे कुटुंबीय आहेत.
जवळपास 250 लोकांची फसवणूक
या पन्नास कुटुंबांनी मुदत ठेवीच्या बदल्यात राहायला मोफत घर मिळत असल्याच्या आमिषाने सुमारे सात कोटी रूपये मागच्या दोन वर्षांत नूर अहम्मद याच्या स्वाधीन केल्याचे म्हटले होते. मात्र, या सदस्यांची संख्या जवळपास 250 झालेली असून ही फसवणूक कोट्टय़वधी रूपयांची आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे नूर अहम्मदविरूध्द जवळपास 70 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. या तक्रारदारांची सुमारे चार कोटींची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. या प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग आहे. तिच्या नावेही काही भाडे करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिच्याविरूध्दही गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
भाडे थकल्याने नूरचे फुटले होते बिंग
आपल्याकडे मुदत ठेव म्हणून काही लाखांची रक्कम ठेवल्यास मोफत राहण्याची व्यवस्था करतो. घर सोडताना रक्कम परत करतो, असे आमिष नूर अहम्मद हा लोकांना दाखवत होता. प्रत्येक कुटुंबाने त्याला पाच ते दहा लाख रूपये दिले होते. आपल्या आर्थिक व्यवहारांवर लोकांनी विश्वास ठेवावा यासाठी नूर अहम्मद पैसे घेतल्याचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र व इतर कायदेशीर सोपस्कार करायचा. वास्कोतील मांगोरहिल, नवेवाडे, बायणा, दाबोळी तसेच इतर भागातील लोकांना त्याच्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले होते. हे सर्व लोक त्याने दिलेल्या भाडय़ाच्या घरातच राहात होते. मात्र, ज्या घरात हे भाडेकरू राहात होते, त्याच घरमालकांचे भाडे थकल्याने नूर अहम्मदचे बिंग फुटले होते. त्या क्षणापासून तो कुटुंबासह पसार झाला होता.
भाडय़ाचेही घर नाही आणि स्वतःचेही नाही
काही लोकांनी कर्जे काढून, दागिने विकून तर काहींनी आपले राहते घर छोटे असल्याने ते विकून किंवा दुसऱयाला भाडय़ाने देऊन मोठय़ा घरात राहायला मिळेल व कुटुंबातील सर्व सदस्यांची सोय होईल अशा आशेने त्याच्याकडे लाखो रूपये जमा करून त्याने दिलेल्या घरात राहणे पसंद केले होते. रोख रक्कम जमा केलेल्या लोकांना सदर नूर अहम्मद स्वतःच एखादय़ा घरमालकाकडे करार करून त्यांना भाडय़ाने ठेवत होता. भाडे आपण फेडत होता. लोकांना राहायला दिलेले काही फ्लॅट त्याने आपलेच असल्याचेही भासवलेले होते. फसले गेलेले सर्व कुटुंबीय आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काहींना भाडय़ाचेही घर नाही आणि स्वतःचेही घर नाही अशा संकटाला सामोरे जावे लागलेले आहे.
लोकांना फसवणे हाच होता व्यवसाय
नूर महम्मद (34) ही व्यक्ती मूळ बिहारी असून नऊ वर्षांपूर्वी तो वास्कोतील एका हॉटेलात कामासाठी आला होता. तिथे काम करता करताच ते हॉटेलही तो चालवू लागला. त्याने इथूनच आपले अन्य जोडधंदेही सुरू केले. मागच्या चार पाच वर्षांपासून लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवायलाही सुरू केले होते. एखादय़ाला वश करण्यासाठी भाडय़ाच्या लक्झरी गाडय़ांचा वापर करणे, थापा मारणे, गोड बोलणे अशी त्याच्या व्यवहाराची पध्दत बनली होती. रेल्वे स्थानकाजवळील भटक्या लोकांना जेवण देणे, त्यांना कपडे देणे, आपण देवभक्त असल्याचे भासवणे अशा प्रकारेही तो लोकांवर छाप पाडायचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबद्दलच्या चांगल्या चर्चेमुळेच लोकांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता.
कोट्टय़वधींची माया जमवून पळण्याचे केले होते निश्चित
नूर अहम्मद याने जास्तीत जास्त लोकांकडून करोडो रूपये जमा करून पसार होण्याचे पक्के नियोजन केले होते असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फसल्या गेलेल्या काही लोकांना त्याने फ्लॅट विकण्याचेही आमिष दाखवले होते. काहींना पाच वर्षांनंतर मुदत ठेव व्याजासह परत देण्याचेही आमिष दाखवले होते. मात्र, फ्लॅटच्या मालकाला आपणच भाडेकरू असल्याचे भासवले होते. भाडेकरू आणि फ्लॅट मालकाची भेट होणार नाही याचीही काळजी तो घेत असे. नूर अहम्मद याचा ठावठिकाणा लागल्याने त्याला पकडण्यासाठी बिहारला रवाना झालेल्या पोलिसांच्या पथकाने बिहार आणि नेपाळ पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून नेपाळच्या सिमेवर त्याला जेरबंद केले आणि काल बुधवारी गोव्यात आणले.