डिसेंबरमध्ये वाढला बेरोजगारी दर ः मागील 16 महिन्यांमधील सर्वाधिक प्रमाण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नव्या वर्षात देशासमोर अनेक आव्हाने असून यातील सर्वात मोठे आव्हान वाढत्या बेरोजगारीचे आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात बेरोजगारी दर वाढून 8.3 टक्के आहे. हे प्रमाण मीगल 16 महिन्यांमधील सर्वाधिक ठरले आहे.
देशामध्ये शहरी बेरोजगारी दर डिसेंबरमध्ये वाढून 10.09 टक्के झाला आहे. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा 8.96 टक्के होता. ग्रामीण बेरोजगारी दर 7.55 टक्क्यांवरुन कमी होत 7.44 टक्के झाला आहे. बेरोजगारी दरात वाढ होत असली तरी ही आकडेवारी भयावह चित्र निर्माण करत नाही, कारण श्रम भागीदारीत चांगली वृद्धी झाली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण वाढून 40.48 टक्के झाले असून हा आकडा 12 महिन्यांमध्ये सर्वाधिक ठरल्याचे उद्गार सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी काढले आहेत. देशात डिसेंबरमध्ये रोजगारदर वाढून 37.1 टक्के झाला आहे. जानेवारी 2022 नंतरचे हे सर्वाधिक प्रमाण ठरले असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून संकलित आणि नोव्हेंबरमध्ये जारी तिमाही आकडेवारीनुसार त्यापूर्वीच्या तिमाहीतील 7.64 टक्क्यांच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत बेरोजगारी दर कमी होत 7.2 टक्के राहिला होता.