पर्यटकांच्या सुविधेसाठी बीआरओचे मोठे पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमावर्ती भागांमध्ये प्रवास करत असल्यास काही काळानंतर मार्गात विश्रांतीच्या ठिकाणाबद्दल चिंता करण्याची गरज भासणार नाही. सीमा रस्ते संघटना (बीआरओ) आता पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमेवरील दुर्गम भागांमध्ये जाणाऱया मार्गांवर कॅफे सुरू करणार आहे. या कॅफेंना बीआरओ कॅफे असे म्हटले जाणार आहे.
12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामंध्ये बीआरओ 75 ठिकाणी कॅफे सुरू करणार आहे. सीमावर्ती भागात वाणिज्यिक घडामोडींना चालना आणि पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. यामुळे या भागातील आर्थिक घडामोडी वाढणार असून सीमावर्ती भागात राहणाऱया लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सीमावर्ती भागातील दुर्गम भागांपर्यंत बीआरओ कार्यरत आहे. सैन्याच्या सामरिक गरजांची पूर्तता करण्यासह चीन आणि पाकिस्तान सीमेनजीक राहणाऱया लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठीही बीआरओ काम करत आहे. याचमुळे अत्यंत दुर्गम मानल्या जाणाऱया भागांमध्ये आता पर्यटक पोहोचू लागले आहेत. संरक्षण मंत्रालयानुसार सीमावर्ती भागांमधील प्रतिकूल भौगोलिक स्थिती आणि हवामानात पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी अशाप्रकारच्या कॅफेंची निर्मीत करण्याची गरज जाणवली. हे कॅफे पीपीपी मॉडेलवर असणार आहेत. याकरता परवाने दिले जाणार आहेत.
हा परवाना 15 वर्षांसाठी राहणार असून त्याचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढविता येणार आहे. बीआरओ कॅफेमध्ये पार्किंग, फूड प्लाझा, रेस्ट रुम, मेडिकल रुम असणार आहे. 75 बीआरओ कॅफेंपैकी 19 अरुणाचल प्रदेशात, 12 जम्मू-काश्मीरमध्ये, 14 लडाखमध्ये, 11 उत्तराखंडमध्ये, 7 हिमाचल प्रदेशात, 2 आसाममध्ये, राजस्थानात 5 तर नागालँड, पंजाब, सिक्कीम, मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक कॅफे असणार आहे.